रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच मंगळवारी वारी दि २७ मे रोजी दुपारी रेणापूर महसूल मंडळात अतिवृष्टी झाली तर तालुक्यात अन्य ठिकाणी दमदार पाऊस झाला या पावसामुळे सेवादासनगर तांड्याजवळील पूल पाण्याखाली गेल्याने रेणापूर ते खरोळा वाहतूक ठप्प झाली तसेच शहरापासून कांही अंतरावर असलेल्या काळेवाडी जाणा-या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने रेणापूर ते काळेवाडी, कामखेडा वाला, तत्तापूर या गावांकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
रेणापूर तालुक्यात गेल्या सोमवार दि. (१९ मे ) पासून मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वादळी वा-यासह मुसळधार पाऊस पडत आहे. वादळी वा-यामुळे गव्हाण ,समसापूर , इंदरठाणा अन्य गावातील घरावरील पत्रे उडाली, अनेक जुने घरे कोसळून मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने शेताला छोट्या तळ्याचे स्वरूप आहे त्यामुळे . शेतीचे बांध फुटत आहेत. लहान ओढे व नाले भरून वाहत आहेत परिणामी शेतीला मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. आंब्याच्या झाडाला एकही आंबा राहिला नाही. तालुक्यात कांही ठिकाणी विजा पडून पाच जनावरे दगावली असून इंदरठाणा या गावत एका सालगड्याचा मृत्यू झाला. या पावसाचा फळबागा व भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान मंगळवारी दि २७ मे रोजी दुपारी पुन्हा रेणापूर महसूल मंडळात अतिवृष्टी झाली तर अन्य तालुक्यात दमादार पाऊस झाला .
या पावसाने रेणापूर ते खरोळा जाणा-या मार्गावरील सेवादास नगर तांडयाजवळील पुल पाण्याखाली जाऊन पाणी लागतच्या शेतात घुसल्याने शेतीचे नुकसान झाले. याची माहिती मिळताच रेणापूरच्या तहसीलदार मंजुषा भगत, सहाय्यक महसूल अधिकारी दिव्या घुंडरे, मंडळाधिकारी सानिया सौदागर, संजय घाडगे, संजय गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी दिलीप देवकते, विकास बुबणे या कर्मचा-यांनी दोन्ही ठिकाणी जाऊन पाहणी केली व वाहनधारकांना या पाण्यातून न जाण्याचे आवाहन केले .पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने कांदा, आंबा टोमॅटोसह इतर भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत असल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.