मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये तेजीने वाढ पाहायला मिळत आहे. ही वाढ आता ९१ हजारांच्या पार गेली आहे. कारण रंगपंचमीच्या दिवशी सोन्याचा दर९१ हजार ४६४ रुपये नोंद करण्यात आला होता. जीएसटीसह या दराची नोंद करण्यात आली होती. सोन्याच्या दरामध्ये झालेली ही वाढ आजपर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याचे स्वत: सराफा व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अनेक देशांवर वाढीव आयात शुल्क आकारण्यात येत आहे. यातून जागतिक व्यापार युद्धाच्या शक्यतेने निर्माण झालेल्या अनिश्चिततेत, सुरक्षित पर्याय म्हणून परदेशात लोकांनी सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. याचाच परिणाम भारतातही पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये शुक्रवारी मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
तर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा सोन्याचे दर हे प्रति औंस ३ हजार डॉलरच्यावर गेल्याचे पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात भारतातही मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील जळगाव हे सोन्यासाठी प्रसिद्ध असे शहर आहे. या शहरात तर सोन्याच्या भावाने सर्वाधिक उच्चांक गाठला होता.
जळगावमध्ये याआधी १४ फेब्रुवारीला सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. १४ फेब्रुवारीला जळगावात सोन्याचे दर हे ८९,०९५ हजार रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर हे दर खाली-वर होत राहिले. पण गुरुवारी (ता. १३ मार्च) म्हणजे एक महिन्यानंतर जळगावात २४ कॅरेट सोन्याच्या दराने जीएसटीसह ८९,९१९ रुपये प्रतितोळा अशी झेप घेत फेब्रुवारीमधील उच्चांक मोडला. हा उच्चांकही दुस-याच दिवशी शुक्रवारी सुमारे १,३३९ रुपयांची वाढ झाल्याने मागे पडला. सोने ९१,४६४ रुपयांपर्यंत पोहोचले. अशाच प्रकारे चांदीच्या दरातही एकाच दिवसात २,५७५ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदी जीएसटीसह एक लाख चार हजार ५४५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली.