सोलापूर-
परिविक्षाधीन कालावधी संपल्याने कागदपत्रे पडताळणीत विविध त्रुटी आढळल्याने महापालिकेतील तिघा कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली तर कामगार न्यायालयाच्या स्थगितीमुळे एका कर्मचाऱ्याची कारवाई प्रलंबित ठेवण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांना महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर २०१४ मध्ये अर्ज केल्यानंतर सेवेत सामावून घेण्यात आले होते. अनुकंपा तत्त्वाखाली महापालिकेच्या आस्थापनेवर सेवेत सामावून घेतलेल्या विविध विभागांतील तिघा कर्मचाऱ्यांची परिविक्षाधीन कालावधी संपल्याने कागदपत्रे पडताळणी करतानाविविध बाबींमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तसेच त्यांना सेवेत सामावून घेताना कागदपत्रे तपासणाऱ्या त्या वेळेच्या तीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील महापालिका आयुक्तांनी नोटिसा बजावल्या आहेत.
त्रुटी आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य विभागातील ड्रेसर अक्षय अलकुंटे, नगर अभियंता विभागातील रखवालदार कृष्णा नंदकुमार कोरे आणि आरोग्य विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपिक रघू मंदोलू आणि संगणक विभागातील कॉम्प्युटर ऑपरेटर दर्शना काटेवाल अशा चौघांचा समावेश आहे. महापालिका प्रशासनाने त्यांच्या या त्रुटी संदर्भात त्यांना नोटिसा दिल्या होत्या.
सामान्य प्रशासन विभागाकडे त्यांच्या नोटिसांचे उत्तर
प्राप्त झाले. अखेर यापैकी रखवालदार कृष्णा कोरे, ड्रेसर अक्षय अलकुंटे, लिपिक रघू मंदोलू या तीन कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला. तसे आदेशही आयुक्तांनी काढले आहेत. तर संगणक विभागातील कॉम्प्युटर ऑपरेटर दर्शना काटेवाल यांच्या प्रकरणी कामगार न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांची कारवाई तोपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आली आहे.या प्रकरणात कागदपत्रे तपासणाऱ्या त्या कालावधीतील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांचे उत्तर हे तिन्ही अधिकारी देणार आहेत.
दरम्यान, सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग शासन परिपत्रकनुसार अर्ज मुदतीत नसल्याने नियुक्तीस अपात्र असल्याचे उपलब्ध कागदपत्रानुसार दिसून आले आहे. लाड कमिटीअंतर्गत नियुक्ती आज्ञापत्रातील शर्ती व अटींचे उल्लंघन झाल्यामुळे सोलापूर महापालिकेच्या सेवेतून कनिष्ठ श्रेणी लिपिक रघू नागेश मंदोलू यांना सेवेतून काढून टाकण्यात येत आहे. कै. नंदकिशोर अलकुंटे यांना चार आपत्य असल्याने त्यांचे कुटुंब हे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णयानुसार अपात्र ठरत असल्याने त्यांचे वारसदार म्हणून अक्षय अलकुंटे यांची ड्रेसर या पदावर अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती आज्ञापत्रातील शर्ती व अट क्रमांक ९ चे उल्लंघन झाल्यामुळे त्यांना महापालिकेच्या सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. तर नगर अभियंता कार्यालयातील रखवालदार कृष्णा नंदकुमार कोरे यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारे अनुकंपा धोरणाचा लाभ घेत नियुक्ती मिळवलेली असल्याने त्यांची नियुक्ती अज्ञापत्रातील शर्ती व अटींचे उल्लंघन झाल्यामुळे महापालिकेच्या सेवेतून त्यांना काढून टाकण्यात आले आहे.