32.5 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeसोलापूरसोलापूर, माढा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

सोलापूर, माढा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

विविध मतदान केंद्रांत जय्यत तयारी; २६ हजार ५१८ कर्मचाऱ्यांची नेमणूक,दोन्ही मतदारसंघांत ४० लाख २१ हजार ५७३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

सोलापूर: लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील ७ मे रोजी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे. मतदारांनी निर्भय, निःपक्ष व कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले.

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांसाठी मंगळवार, ७ मे रोजी यावेळेत दोन्ही मतदारसंघांतील तीन हजार ९९८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठी २६ हजार ५१८ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे. विविध मतदान केंद्रांवर उन्हापासून बचावासाठी मंडप, पाण्याची सोय, दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअरची सोय करण्यात आली आहे. दोन्ही मतदारसंघांत ४० लाख २१ हजार ५७३ मतदार आहेत. सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांसाठी विविध संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त दोन हत्यारी पोलिस तैनात करण्यात येणार आहेत.असे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगीतले.

राजकीय पक्षांकडून तब्बल १३ दिवस प्रचाराचा धुराळा उडाल्यानंतर अखेर प्रचाराच्या तोफा थंडावल्या. सोलापूर लोकसभेसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत तर माढा मतदारसंघात ३२ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, मंगळवारी दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध मतदान केंद्रांवर तयारी केली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ,सोलापूर शहर, सोलापूर शहर मध्य सोलापूर दक्षिण अक्कलकोट, पंढरपूर या सहा विधानसभा मतदारसंघांत एकूण एक हजार ९६८ मतदान केंद्र उभारण्यात आली आहे. या केंद्रांवर २० लाख ३० हजार ११९, तर माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा ,माढा, सांगोला, माळशिरस, फलटण ,माण या सहा विधानसभा मतदारसंघांत दोन हजार ३० केंद्रांवर १९ लाख ९९ हजार ४५४मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी प्रशासकीय व पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून आवश्यक त्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त आहे.

सोलापूर जिल्ह्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडला आहे, मात्र तेथील मतदानाची व्यवस्था सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने केली आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघात तीन लाख १९ हजार ४२६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी, एक शिपाई एका पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात १४ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. या मतदारसंघातील एक हजार ४२ मतदान केंद्रांवर वेबकास्टींग होणार आहे तसेच ८५ वर्षांवरील २७ हजार २८०, दिव्यांग १६ हजार ४३०, अत्यावश्यक सेवेतील ५२९ असे एकूण४४हजार २३९ टपाली मतपत्रिकेचे मतदार होणार आहे. सोलापूर मतदारसंघात मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी दोन हजार ४५७ बैलेट युनिट, दोन हजार ४५७ कंट्रोल युनिट व दोन हजार ६५२ व्हीव्हीपैट इतक्या मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात शहरी २५२ ग्रामीणमध्ये एक हजार ७७८ मतदान केंद्र आहेत. यातील १८ मतदान केंद्र संवेदनशील आहेत.या मतदारसंघात एक हजार २७ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. तसेच दहा युवा संचालित मतदान केंद्र, १२ महिला संचलित मतदान केंद्र, सहा दिव्यांग संचलित मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. माढा मतदारसंघात ८५ वर्षावरील ३२ हजार १४४, दिव्यांग मतदार १४ हजार २३२, तर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी ३६६ असे एकूण ४६७२ पोस्टल मतदार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी आठ हजार १९ बॅलेट युनिट, दोन हजार ६७३ कंट्रोल युनिट ,दोन हजार ८२० व्हीव्हीपॅट मशिन उपलब्ध केल्या आहेत. या मतदारसंघातील मतदान केंद्रांवर ११ हजार ५०५ मतदान अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदान केंद्रांवर नियुक्त शहर मध्य शहर उत्तर व सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अधिकारी कर्मचार्‍यांना सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून नू.म.वि. शाळेत व विविध ठिकाणी कडक बंदोबस्तात ईव्हीएम मशीनसह अन्य मतदान साहित्य वाटप करण्यात आले. अन्य विधानसभा मतदारसंघातील साहित्य त्या त्या तहसील कार्यालयात वाटप करण्याची सोय करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर साहित्य पोहोचविण्यासाठी ठिकठिकाणी बसची सोय करण्यात आली आहे.
सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांत मतदान केंद्रावरील ईव्हीएम व अन्य मतदान साहित्य व कर्मचारी एस.टी. बसने पाठविण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावर सोडण्यात येणाऱ्या एस.टी. बससाठी जीपीएस यंत्रणा लावण्यात येणार आहे. यावर जिल्हाधिकारी कार्यालयातून लक्ष राहणार आहे.

सोलापुरात २१, माढ्यात ३२ उमेदवार रींगणात आहेत.सोलापूर लोकसभा मतदारसंघात आ. प्रणिती शिदे (कॉंग्रेस), आ.राम सातपुते (भाजप) यांच्यासह २१ उमेदवार रिंगणात आहेत. तर माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते-पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष), रणजितसिंह नाईक-निंबाळकर (भाजप) या प्रमुख उमेदवारांसह ३२ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही मतदारसंघांत चुरशीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून उमेदवार अधिक आलेल्या ठिकाणी अधिक यंत्रे उपलब्ध करण्यात आली आहेत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात २१, तर माढा लोकसभा मतदारसंघात ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे यंदाच्या वेळी सोलापूर लोकसभेसाठी दोन माढ्यासाठी तीन मशिन, एक व्हीव्हीपॅट असणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

सोलापुरात १४, तर माढ्यात १८ संवेदनशील मतदान केंद्र आहेत.सोलापुरात १०४२ तर माढ्यात १०२७ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार. युवा संचलित, महिला संचलित, दिव्यांग संचलित मतदान केंद्र आहेत.
उन्हामुळे मंडप, पिण्याच्या पाण्याची सोय ,रांग असल्यास खुर्च्यांची तर दीव्यांगांसाठी व्हीलचेअरची सोय करण्यात आली आहे. माढ्यात ११ हजार ५०५, सोलापुरात १५ हजार १३ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR