30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रदिंडोरीत सर्वाधिक उच्चशिक्षित उमेदवार

दिंडोरीत सर्वाधिक उच्चशिक्षित उमेदवार

दिंडोरी : लोकसभेत पोचल्यानंतर मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी हिंदी व इंग्रजीचा वापर होत असल्याने उमेदवारांच्या शिक्षणाला हल्ली फार महत्त्व प्राप्त झाले आहे. नाशिकच्या उमेदवारांपेक्षा दिंडोरी या राखीव मतदारसंघातील उमेदवार उच्चशिक्षित असल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये ‘डिप्लोमा’ विरुद्ध ‘डिग्री’ अशी लढाई होणार आहे. दिंडोरीत एमबीबीएस विरुद्ध एम. ए. बी. एड. अशी लढत रंगलेली दिसून येते.

लोकसभा निवडणुकीत यंदा विरोधी उमेदवाराला इंग्रजी बोलता येते का? हा मुद्दा चांगलाच गाजला. त्यावरून काही उमेदवारांची ‘लिटमस टेस्ट’ही झाली. त्यामुळे उमेदवारांचे शिक्षण हा मुद्दा आता लोकसभा प्रचाराच्या केंद्रस्थानी दिसत आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन मतदारसंघांतील उमेदवारांच्या शिक्षणाची तुलना केली, तर नाशिकमध्ये दिंडोरीतील उमेदवारांपेक्षा कमी शिकलेले उमेदवार आहेत.

दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार असलेले हेमंत गोडसे यांनी पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातून ‘सिव्हिल डिप्लोमा’ पूर्ण केला आहे. महायुतीचे उमेदवार राजाभाऊ (पराग) वाजे यांनी सिन्नरच्या वाजे महाविद्यालयातून बी. कॉम.पर्यंत शिक्षण घेतले आहे. राजाभाऊंच्या बाबतीत इंग्रजीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. परंतु, त्यांनी इंग्रजीतच सडेतोड उत्तर दिल्याने हा मुद्दाच निकाली निघाला आहे.

इतर उमेदवारांचा विचार केला, तर अपक्ष अनिल जाधव यांनी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्याव्यतिरिक्त अपक्ष उमेदवार विजय करंजकर मुक्त विद्यापीठातून बी. ए. उत्तीर्ण झाले आहेत. जितेंद्र भावे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बी. कॉम.पर्यंत शिक्षण घेतले आहे. वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांचे बारावीपर्यंत, तर शांतिगिरी महाराजांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे.

राखीव मतदारसंघ म्हटले, की उच्चशिक्षित आणि प्रचलित उमेदवार मिळणे राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरते. मात्र,दिंडोरी लोकसभा मतदारसंघ याला अपवाद ठरला आहे. येथील प्रमुख पाच उमेदवारांच्या शिक्षणाचा विचार केल्यास विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांनी वैद्यकीय क्षेत्रातील मानाची ‘एमबीबीएस’ पदवी घेतली आहे. त्यांचे विरोधी उमेदवार भास्कर भगरेंनी एम. ए. बी. एड. ही पदव्युत्तर पदवी व व्यावसायिक शिक्षण घेतले आहे.

उपरोक्त दोन्ही उमेदवारांचे शिक्षण तुल्यबळ असल्याने शैक्षणिक मुद्दा प्रचारात दिसून येत नाही. तर माजी खासदार हरिश्­चंद्र चव्हाण यांनी इंग्रजीतून बी. ए. केले आहे. याव्यतिरिक्त इतर उमेदवारांचे शिक्षण हे पदवीच्या आतील असल्यामुळे त्यांना शैक्षणिक मुद्याला धरून प्रचार करता येत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR