लातूर : प्रतिनिधी
तेजोमय दिवाळीच्या सणानिमित्त स्थानिक महिला उद्योजिका, बचत गट आणि लघुउद्योजकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि ‘एक पाऊल महिला सबलीकरणाकडे’ हा विचार समोर ठेवून, विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ या संकल्पनेतून ‘व्ही.डी.एफ. बाजार २०२६’ या उपक्रमांतर्गत दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट लखन परळीकर व पोशाख नाव्या स्टुडिओच्या वसुधा शिंदे यांचे मार्गदर्शन झाले. या सौंदर्यविषयक मार्गदर्शनात महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. या प्रसंगी गोल्ड क्रेस्टहाय लातूरच्या प्राचार्या हिना सिंग, लातूर जिल्हा परिषदेच्या सदस्या सोनाली थोरमोटे, संगीता मोळवणे, लातूर महानगरपालिकेच्या सदस्या श्रावणी झिपरे, प्रज्ञा उटगे, प्रितम जाधव, योगिता जाधव, शीलाताई वाघमारे, पल्लवी सूर्यवंशी, मंदाकिनी पेठे, रोहिणी शिंदे, तनूजा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट लखन परळीकर यांनी आपल्या सौंदर्यविषयक मार्गदर्शनात महिलांनी मेकअप करीत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. इव्हेंटनुसार मेकअप कसा करता येईल, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. जास्त भडक आणि बटबटीत मेकअप टाळावा, असे सांगीतले. पोशाख नाव्या स्टुडिओच्या वसुधा शिंदे यांनी पाच महिलांना पोशाख परिधान करुन पोशाख कसा असावा, याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण केले. या उपक्रमात गृहउपयोगी वस्तू, हस्तकला, खाद्यपदार्थ, कपडे, दिवाळी साहित्य आणि दिवाळी फराळ व सजावटीच्या विविध वस्तूं स्टॉलस् आहेत. सदरील सर्व स्टॉल्स नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांना स्थानिक उत्पादनांचा पर्याय उपलब्ध करून देतानाच, महिला उद्योजिका आणि बचत गटांना आपल्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची सुवर्णसंधी या बाजारातून आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी लातूरकरांनी ‘व्हीडीएफ बाजार’ला कुटुंबीयांसह भेट द्यावी
येथील क्रीडा संकुलावर आयोजित ‘व्हीडीएफ बाजार २०२६’ ला लातूरकरांनी आपल्या कुटुंबीयांसह, मित्रपरिवारासह आणि नातेवाईकांसह आवर्जून भेट द्यावी. सणासुदीच्या काळात आपल्या घरी येणा-या पाहुण्यांनाही या बाजारात घेऊन यावे आणि महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांच्या व्यवसायाला बळ द्यावे, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. या बाजारात बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिला उद्योजिका सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन मॉलमध्ये किंवा अन्य योग्य ठिकाणी विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महिला उद्योजिकांच्या मेहनतीला प्रोत्साहन देत त्यांच्या उत्पादनांना ग्राहक मिळवून देणे आणि त्यांना व्यवसायाच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, हा ‘व्हीडीएफ बाजार’ आयोजनामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
















