लातूर : प्रतिनिधी
तब्बल १७ दिवसांनंतर लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीत दि. १८ जुलै रोजी सौदा निघाला. आडत्यांनी आपापल्या आडती उघडून व्यवहार सुरु करण्याच्या तयारीत असताना ५५० खरेदीदारांपैकी काही मोजकेच खरेदीदार उपस्थित राहिले. त्यामुळे केवळ २० मिनीटाच्या आत आडत बाजारातील व्यवहार पून्हा ठप्प झाले.
खरेदीदाराने शेतमाल घेतल्यानंतर लागलीच पैसे अदा करावेत, अशी मागणी आडत्यांनी केली आहे. तर दुसरीकडे नियमाप्रमाणे १० दिवसांनंतरच आडत्यांना पैसे देण्याच्या निर्णयावर खरेदीदार ठाम असल्याने गेल्या १ जुलैपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व प्रशासाने हस्तक्षेप करीत तोडगा काढला. खरेदीदारांनी शेतमाल घेतल्यानंतर आडत्यांना २४ तासांत पैसे द्यायचे दि. १६ जूलै रोजी ठरले. दि. १७ जुलै रोजी आषाढी एकादशी व मोहर्रम असल्याने सुटीचा दिवस होता. त्यामुळे दि. १८ जुलै रोजी सौदा काढण्याचा निर्णय झाला. त्यानूसार गुरवारी सकाळी ११ वाजता सभापती जगदीश बावणे व इतर पदाधिकारी व सचिवांच्या उपस्थितीत सौदा निघाला. दोन-तीन आडतींवर सोयाबीनचा भाव ४४०० रुपये निघाला परंतू, खरेदीदारच फिरकले नसल्याने अवघ्या २० मिनीटात आडत बाजारातील व्यवहार पुन्हा ठप्प झाले.
बाजार समितीतील व्यवहार सुरु व्हावेत, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अटोकाट प्रयत्न सुरुच होते. आडते आणि खरेदीदार यांनी वाद न घालता आपापसात समन्वयाने व्यवहार सुरळीत करावेत, असे प्रयत्न गेल्या १५ दिवसांपासून सुरु होते. परंतू, आडते आणि खरेदीदार आपापल्या निर्णयावर ठाम राहिल्याने गेल्या १३ दिवसांत सौदाच निघाला नाही. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने कठोर भुमिका घेत आडत बाजारातील परवानाधारक ५५० खरेदीदारांना शेतमालाच्या सौद्यात २४ तासांच्या आत सहभागी व्हावे, या आशयाच्या नोटीसा दि. ११ जुलै रोजी बजावल्या.
त्यामुळे नोटीसा बजाल्याच्या २४ तासांनंतर शनिवारी खरेदीदार आपला निर्णय मागे घेतील व सौदा निघेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती, परंतू, तसे न झाल्याने शनिवारीही सौदा निघाला नाही. दि. १४ जुलै रविवारची सुटी होती. त्यामुळे १५ जुलै रोजी सौदा निघणे अपेक्षीत असताना खरेदीदार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे सौदा निघाला नव्हता. दि. १६ जुलैलाही सौदा निघाला नाही. १७ जुलै रोजी आषाढी एकादशी व मोहर्रम असल्याने बाजार समितीला सुटी होती. त्यामुळे १८ जुलै रोजी सौदा निघाला परंतू, खरेदीदारांअभावी पुन्हा सर्व व्यवहार ठप्प झाले.
गुरुवारी सौदा निघाला परंतू, तो नावालाच निघाला अशी स्थिती खरेदीदरांअभावी आडत बाजारातील झाली. ४४०० इतका निच्चांकी भाव सोयाबीनचा निझाला तरी खरेदीदारांनी तो घेतला नाही. त्यामुळे आडते आनंद मालु यांनी शेतमालाची खरेदी केली. आडत्यानेच शेतमालाची खरेदी केली परंतू, खरेदीदार पुढे आले नाहीत. जेवढा पैसा तेवढा शेतमाल खरेदी करुन, अशी खरेदीदारांची भुमिका असल्याचे दिसून आले. रोज १०-१० हजार पोते शेतमाल खरेदी करणारे, वर्षभराचा १० लाख पोत्यांपेक्षा जास्त शेतमाल खरेदी करणारे खरेदीदार मात्र फिरकलेच नाहीत. त्यामुळे सौदा निघूनही आडत बाजारातील व्यवहार ठप्प झाले.