परभणी : सोनपेठ येथील पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे आपले कर्तव्य बजावून सोनपेठवरून पाथरीकडे जात होते. भारस्वाडा परीसरात समोरून येणा-या स्कॉर्पिओ व गवारे यांच्या दुचाकीची रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहने ब-याच अंतरापर्यंत फरपटत गेल्याने दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याची माहिती समजते. या अपघातात पोलिस उपनिरीक्षक गवारे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर स्कॉर्पीओ देखील पूर्णत: जळून खाक झाली आहे.
सोनपेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले प्रभाकर गवारे आपले कर्तव्य बजावून सोनपेठवरून पाथरीकडे जात होते. ते मानवत येथील पोलिस कॉलनीत वास्तव्यास होते. भारस्वाडा जवळील वळणावर त्यांच्या गाडीला पाथरीकडून येणा-या स्कॉर्पीओ क्रमांक एम एच १२ एम एल ४७५०ने जोरदार धडक दिली. या धडकेत गवारे यांची दुचाकी दूर जावून पडली व त्यांना मोठ्या प्रमाणात मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच स्कॉर्पीओ देखील जळून खाक झाली. स्कॉर्पीओ मधील चालक व प्रवाशी घटनास्थळावरून पळून गेले. घटनास्थळी दैठण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी. आर. बंदखडके, फौजदार मुंढे, पोलिस कर्मचारी कुकडे, रसाळ यानी घटनास्थळी भेट देवून पुढील कारवाई केली.