लातूर : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्त्री शक्ती लातूर शाखेच्या वतीने शुक्रवार दि. ७ मार्च रोजी स्त्री सुरक्षा आणि स्त्री सन्मान या स्त्रियाच्या गंभीर विषयाबाबत कौटुंबिक स्तरावर व शासकीय स्तरावर कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घूगे यांना दिलेल्या या निवेदनामध्ये ग्रामीण भागात तसेच कार्यालयात आणि कुटुंबामध्ये आई, बहिणीवरुन शिव्या देण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यात कांही गैर किंवा चुकीचे आहे, हेच पुरुषवर्गाच्या लक्षात येत नाही. कांही वेळेस या शिव्या स्त्रियांच्या अवयवावरुन अत्यंत किळसवाण्या शब्दात दिल्या जातात.
घरातील लहान मुलेही याचे अनुकरण करतात आणि सार्वजनिक ठिकाणी व कार्यालयात स्त्रियांचा सन्मान राखला जात नाही. वास्तविक, अशी वर्तणुक भारतीय दंड संहिता कलम ५०९ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७९ नुसार गुन्हा ठरतो आणि या गुन्ह्याला शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात आहे, याचा उहापोह करण्यात आला आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक कार्यालयात, विद्यालयात, महाविद्यालयात, अशा शिव्या न देण्याची शपथ अनिवार्य करणे गरजेचे आहे, या बाबतचे शपथपत्रही निवेदनासोबत देण्यात आले. यावेळी भारतीय स्त्री शक्ती लातूर शाखेच्या अध्यक्षा प्रेमा बाहेती, सचिव संजीवनी सबनीस, उपसचिव विभा बोकील, सदस्या शैला कारंडे, ज्येष्ठ मार्गदर्शक लीला कर्वा व सुलोचना नोगजा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होत्या.