अहिल्यानगर : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेवर प्रशासक येण्यापूर्वी येथे थोरातांच्या नेतृत्वातील मविआची सत्ता होती. मात्र आता विधानसभेच्या निकालाने जिल्ह्यातील समिकरणे बदलली आहेत. गट आणि गणांतही महायुतीची ताकद वाढणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी विखे-थोरात हा संघर्ष पुन्हा एकदा राज्याला पहायला मिळणार आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीची जिल्ह्यातही पडसाद पहायला मिळाले. आता या लाटेवरच स्वार होऊन मिनी मंत्रालय गाठण्यासाठी कार्यकर्त्यांना ‘स्थानिक स्वराज्य’चे वेध लागले आहेत. मुंबईतून तशा सकारात्मक हालचालीही सुरू झाल्याचे वृत्त आहे.
जिल्ह्यात विधानसभेच्या १२ जागांवर नुकतीच निवडणूक झाली. यामध्ये भाजपा महायुतीचा चेहरा म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर महाविकास आघाडीचे नेतृत्व बाळासाहेब थोरात यांनी केल्याचे दिसले. जिल्ह्यात १२ पैकी १० मतदार संघ महायुतीने ताब्यात घेतले आहेत. थोरातांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला अवघ्या दोन मतदार संघातच यश आले.
आता लवकरच स्थानिक स्वराज्यचे नगारे वाजण्याची शक्यता आहे. यातील जिल्हा परिषद ही राजकीय आर्थिक नाडी बनली आहे. तर पंचायत समिती हे तालुक्याच्या आमदारकीचे सत्ताकेंद्र म्हणून पाहिले जाते. त्यामुळे आपापल्या मतदार संघातील पंचायत समित्या ताब्यात घेवून प्रामाणिक काम केलेल्या कार्यकर्त्यांना तिथे ताकद देण्यासाठी महायुतीचे १० आमदार आणि पराभूत झालेले मविआचे विरोधी उमेदवार देखील प्रयत्नशील असणार आहेत.
याशिवाय मिनी मंत्रालयासाठीचे गटही काबीज करण्यासाठी महायुती आणि मविआचे नेते ताकद लावणार आहेत. यासाठी महायुतीकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन व डॉ. सुजय विखे पाटील यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांना सहकार्य मिळणार आहे. तर विधानसभेतील पराभवाचे आत्मपरीक्षण करून मविआचे नेते बाळासाहेब थोरात हे पुन्हा नव्या उमेदीने गट, गणात कार्यकर्त्यांना ताकद देण्याच्या तयारीत असणार आहेत.
विधानसभेत विखेंच्या नेतृत्वात सुसाट सुटलेला महायुतीचा वारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रोखण्यासाठी थोरात हे प्रयत्न करणार आहेत. तर विखे मात्र थोरातांकडून आता जिल्हा परिषदही ताब्यात घेवून त्यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.