22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसंपादकीय विशेषस्मरण झुंजार उमाजीराजेंचे

स्मरण झुंजार उमाजीराजेंचे

राज्य पुनर्स्थापित करण्याचे स्वप्न पाहणारे उमाजी नाईक लहानपणापासूनच धाडसी व लढवय्या बाण्याचे होते. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने आईने त्यांच्यावर संस्कार केले. धाडसी वृत्तीबरोबरच श्रद्धा आणि भक्ती यांचे बीज त्यांच्या मनात रुजवले. लहानपणापासूनच हत्यार चालवणे, व्यायाम करणे, घोडा फिरवणे या गोष्टींबरोबरच जेजुरीच्या खंडोबाच्या वा-या करत. दररोज व्यायाम झाल्यावर क-हा नदीत स्नान करून ओलेत्याने घागरभर पाणी गडावर नेऊन ते खंडेरायाला आंघोळ घालायचे.

ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात लढणा-या उमाजीराजे यांनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजांविरुद्ध एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यात नमूद केले की, ‘भारतातील लोकांनी इंग्रजांच्या चाक-या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा, पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये. तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. हा जाहीरनामा म्हणजे उमाजींनी एक प्रकारे स्वराज्याचा पुकार केल्याचे प्रतीक ठरला. तेव्हापासून उमाजी रयतेचे राजे झाले. संपूर्ण क्रांतिकारकांच्या इतिहासात राजे उमाजी नाईक यांच्याइतका व्यापक जाहीरनामा कोणीही काढलेला नव्हता. हा जाहीरनामा म्हणजे इतिहासातील सोनेरी पानच होय.

उमाजीराजेंना पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखविण्यात आली. उमाजींचा पहिला चरित्रकार मॉकटॉस याने उमाजी नाईक यांच्यावर डायरी लिहिली आहे. तो म्हणतो, ‘उमाजींच्या नजरेसमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श होता. तो डोळ्यासमोर ठेवून शिवाजी महाराजांप्रमाणे आपणही मोठे राज्य करावे अशी त्यांची उमेद होती.’ त्याकरिता त्यांनी यंत्रणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण भारताला नजरेसमोर ठेवून त्यांनी हा जाहीरनामा लिहिला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये १८५७ च्या उठावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण हा उठाव म्हणजे उमाजीराजेंच्या जाहीरनाम्याचा कृतिकार्यक्रम होता.

१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना त्यांना दगाफटक्याने पाडण्यात आले. दीड महिना पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या कोठडीत ठेवण्यात आले. या खोलीत उमजीराजे असताना त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन मॉकिनटॉस दररोज महिनाभर त्यांची माहिती घेत होता. उमाजी राजेंवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि न्यायाधीश जेम्स टेलर याने त्यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारे पहिले क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना ३ फेब्रुवारी १८३२ या दिवशी पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीच्या परिसरात फासावर लटकविण्यात आले. इतरांना दहशत बसावी म्हणून उमजीराजेंचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकवून ठेवले होते. उमाजीराजेंसोबत इंग्रजांनी त्यांचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.

राजे उमाजी नाईक यांना ज्या ठिकाणी देहदंडाची शिक्षा देण्यात आली त्या ठिकाणी आज स्मारकाचे काम चालू आहे. याच ऐतिहासिक वास्तूमध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची व अभ्यासिकेची सोय करण्यात आली आहे. अनेक सामाजिक कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविले जातात. राजे उमाजी नाईक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजचे कार्यकर्ते प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.

-बालाजी शिंदे, समाजशास्त्र अभ्यासक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR