30.2 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeसंपादकीय विशेषज्ञानयोगी-भक्तीयोगी-कर्मयोगी गुरुवर्य..!

ज्ञानयोगी-भक्तीयोगी-कर्मयोगी गुरुवर्य..!

समाजातील काही असामान्य व्यक्तींना वेगळ्या अशा ओळखीची कधीही गरज नसते, त्यांनी समाजासाठी केलेले कार्य हीच त्यांची खरी ओळख असते. असेच एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व जे सातत्याने जगाच्या विश्वशांतीसाठी झटत असते आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर हजारो विद्यार्थ्यांनी आपले यशस्वी करिअर घडविले आहे, असे ज्ञानयोगी-भक्तीयोगी-कर्मयोगी गुरुवर्य, म्हणजे प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड सर!

प्रा. डॉ. कराड सरांनी आपल्या नि:स्वार्थी कार्यपध्दतीने जगभर स्वत:चा ठसा उमटविला आहे. त्यांच्याइतकी नि:स्वार्थी भावनेने जगाच्या कल्याणासाठी व विश्वशांतीसाठी अहोरात्र झटणारी व्यक्ती सध्याच्या काळात सापडणे दुर्मिळच! त्यांच्या सेवाभावी वृत्तीने ४ दशकांपेक्षा अधिक काळ निर्विवादपणे एक परिपूर्ण आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व! शिक्षणाचे माहेरघर असणा-या पुण्यात सामाजिक, शैक्षणिक, आधुनिक तंत्रज्ञान, जनसामान्यांच्या समस्या, अध्यात्म आदी क्षेत्रांत परिपूर्ण सखोल अभ्यास असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांना भेटल्यावर परिपूर्ण, निपुण, आदर्श समाजसेवकाच्या गुणांची अनुभूती कुठल्याही व्यक्तीला लगेच भावते. शिक्षण क्षेत्रात एवढे मोठे कार्य करूनसुद्धा गर्वाचा साधा लवलेशही त्यांच्या बोलण्यातून कधीही जाणवत नाही. एखादा माणूस त्यांना भेटला, त्याला डॉ. कराड साहेबांचा सहवास एकदा का लाभला की तो कायमचा त्यांच्याशी जोडला गेलाच असे समजा. त्याचमुळे त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारी माणसे प्रत्येक ठिकाणी सापडतात.

स्वतंत्र व स्वयंभू विचाराचे असल्यामुळे व कोणाची ताबेदारी आवडत नसल्यामुळे प्रा. डॉ. कराड साहेबांनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे(सीओईपी) येथील प्राध्यापकपदाचा राजीनामा देऊन माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेची बीजे रोवली. त्यांनी १४ एप्रिल १९८१ रोजी ‘महाराष्ट्रात तांत्रिक शिक्षणाची अपुरी सोय’ या शीर्षकाचा एक लेख ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दैनिकात लिहिला. आणि त्यानंतर बरोबर दोन वर्षांनी स्वत:च पुढाकार घेऊन १४ एप्रिल १९८३ रोजी पुण्यात महाराष्ट्र अ­कॅडमी ऑफ इंजिनीअरिंग ऑफ टेक्नॉलॉजी रिसर्च या संस्थेची आणि त्यापाठोपाठ २४ जून १९८३ रोजी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे या इंजिनीअरिंगमधल्या विविध शाखांचे शिक्षण देणा-या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात माईर्स, पुणे या संस्थेच्या आधिपत्याखाली इंजिनीअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट या विषयांचे शिक्षण देणारी महाविद्यालये आणि असंख्य प्राथमिक-माध्यमिक शाळाही उभ्या राहिल्या.

या संस्थांचे तत्त्वविषयक कार्य बघूनच युनेस्कोच्या शाखेने माईर्स एमआयटी या संस्थेला खास अध्यासन देऊन या संंस्थेस मानवी हक्क, लोकशाही आणि शांतीच्या सर्वांगीण विचारासाठी काम करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डॉ. कराड यांनी लावलेली बीजं आज वटवृक्षामध्ये परिवर्तीत झालेली आहेत. याचा विस्तार आता चार विद्यापीठांमध्ये झाला आहे. ज्या माध्यमातून तब्बल ५५ हजार विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत. स्वामी विवेकानंद यांना आपल्या जीवनाचे आदर्श मानणारे डॉ. कराड यांची ख-या अर्थाने जडणघडण झाली. त्यांचा स्वभाव, मनमिळाऊ, स्पष्टवक्तेपणा, विनोदबुध्दी, दूरदृष्टी, जाती-धर्मभेदाला थारा न देणारे, संयमी व सर्वांना बरोबर घेऊन चालणारे या गुणांमुळे ते मित्रपरिवाराला व समाजाला सदैव हवेहवेसे वाटतात.

नेहमी माणूस घडवण्याचे काम डॉ. कराड यांनी केले आहे. हेच लक्ष्य ठेवून त्यांनी संत ज्ञानेश्वर व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाने संपूर्ण जगाला आश्चर्य व हेवा वाटावा अशा प्रकारच्या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाची निर्मिती लोणी-काळभोर येथील विश्वराजबागेत केली आहे. विश्वशांती व मानवतेचा संदेश देणा-या जगातील सर्वांत मोठ्या अशा घुमटाची ही निर्मिती आहे. आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच ज्यांनी मानवी इतिहास घडविला अशा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, आईन्स्टाईन, न्यूटन, कांट, हेगेल असे जगातील संत, शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ यांचे भव्य ५४ पुतळे या घुमटात प्रस्थापित केले आहेत. ही भव्य वास्तूनिर्मिती केल्यावर प्रा. डॉ. कराड म्हणतात की, हे मी केले नाही तर माऊलींच्या हातून घडले आहे. तसेच ही वास्तू डॉ. कराड यांनी भारतमातेच्या नावाने उभारून तिला समर्पित देखील केली आहे.

एकीकडे जग कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट, आयटी, डिजिटल तंत्रज्ञान, रोबोटिक्स, अंतराळात प्रवास यासारख्या आश्चर्यकारक वैज्ञानिक आणि औद्योगिक विकासाचे साक्षीदार आहे आणि दुसरीकडे दुर्दैवाने, संपूर्ण अनागोंदी, गोंधळ आहे. जात, पंथ, वंश, धर्म आणि राष्ट्रांच्या सीमा या क्षुल्लक मुद्यांच्या नावाखाली संशय, दहशतवाद, रक्तपात, हिंसाचार आणि नरसंहारामुळे मानवजातीच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक असलेली कुटुंबव्यवस्थाही संकटात सापडली असताना प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड साहेबांसारख्या विश्वशांतीसाठी अहोरात्र झटणारी व्यक्ती ही काळाची गरज बनली आहे. अशा विश्वधर्मी प्रा. डॉ. कराड साहेबांची महती खालील पंक्तींमधून प्रतित होते.
‘‘ज्ञानोबा-तुकयाची भक्ति!
तन-मन-धन हे करुनि समर्पण!!
विवेक विचारांतुनि ये शक्ति!
विश्वशांतीचे अखंड चिंतन!!’’
ज्ञानवर्धन, चारित्र्यसंवर्धन आणि विश्वशांतीस्थापनेचा ध्यास घेतलेल्या अषितुल्य व्यक्तिमत्त्व विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या ८३ व्या जन्मदिनानिमित्त अभीष्टचिंतन!

-प्रा. चंद्रकांत बोरुडे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR