31.4 C
Latur
Thursday, February 13, 2025
Homeलातूरस्वच्छता, रस्ते, स्ट्रीट लाईट दुरूस्तीला प्राधान्य

स्वच्छता, रस्ते, स्ट्रीट लाईट दुरूस्तीला प्राधान्य

लातूर : प्रतिनिधी
श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयातर्फे आयोजित केली जाणारी ७२ वी महाशिवरात्री यात्रा २६ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे. या यात्रेसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून, तसेच जिल्ह्याबाहेरुन मोठ्या संख्यने भाविक उपस्थित राहतात. या भाविकांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी देवस्थान यात्रा समिती आणि जिल्हा प्रशासनातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकरी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दि. १२ फेब्रुवारी रोजी येथे दिल्या. श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थान महाशिवरात्री यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे निरीक्षक तथा श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानचे  प्रशासनक सचिन जांबुतकर, विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले, बाबासाहेब कोरे, नरेश पंड्या, सुरेश गोजमगुंडे, रमेश बिसेन, विशाल झांबरे, व्यंकटेश हालींगे, राजेंद्र पतंगे, ओमप्रकाश गोपे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर,  कृषी उपसंचालक महेश क्षीरसागर यांची यावेळी उपस्थित होते.
श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानची यात्रा हे लातूरचे वैभव आहे. या यात्रेची महती जिल्ह्याबाहेर इतर राज्यातही पोहचली आहे. विविध राज्यातूनही याठिकाणी भाविक येतात. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांच्या होणा-या गर्दीचा विचार करुन वाहतूक, पार्किंग, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे. यासाठी देवस्थान लातूर शहर महानगरपालिका व पोलीस यांनी आवश्यक कार्यवाही आतापासूनच सुरु करावी. मंदिर परिसरात स्वतंत्र पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करावा. तसेच ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि धोक्याची सूचना देणारी यंत्रणा सज्ज ठेवावी. भाविकांच्या रांगा लावण्यासाठी, तसेच भाविकांना मदत करण्यासाठी देवस्थानमार्फत स्वयंसेवक नेमून त्यांना गर्दीत ओळखू येतील, असे गणवेश व ओळखपत्र पुरविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
मंदिराकडे जाणा-या प्रमुख मार्गांची दुरुस्ती करावी, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गांवरील स्ट्रीट लाईट्स तातडीने सुरु करण्याची कार्यवाही महानगरपालिकेने करावी. मंदिर परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे.
तसेच आत्पकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रणा, रुग्णवाहिका सज्ज ठेवावी. अन्न व औषध प्रशासनाने यात्रा कालावधीत विक्री होणा-या खाद्यपदार्थांचे वेळोवेळी नमुने घेवून तपासणी करावी.
विषबाधेसारखे प्रकार टाळावेत, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. तसेच यात्रा कालावधीत पशुसंवर्धन विभागामार्फत पशुप्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. यासोबतच कृषी विभागानेही विविध योजनांची माहिती देणारी दालने उभारून कृषि प्रदर्शनातून यात्रेमध्ये येणा-या शेतक-यांमध्ये जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले.
यात्रा कालावधीतील गैरप्रकार रोखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच गर्दीमध्ये साध्या वेशातील पोलीस तैनात केले जाणार असल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी दिली. श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यात्रेनिमित्त यात्रा कालावधीत कृषी प्रदर्शन व पशुप्रदर्शनाचे आयोजन करावे. जेणेकरून याठिकाणी येणा-या नागरिकांना कृ.षी विषयक योजनांची माहिती मिळेल, असे विक्रम गोजमगुंडे यावेळी म्हणाले.
श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यात्रेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण व महाभिषेक केला जातो, या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी देवस्थानच्यावतीने जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांना निमंत्रण देण्यात आले. देवस्थान समिती, पोलीस, आरोग्य विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, एसटी महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्फत करण्यात येणा-या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR