20 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeलातूरहमीभाव केंद्र सुरू, तरी सोयाबीनचे दर सावरेनात

हमीभाव केंद्र सुरू, तरी सोयाबीनचे दर सावरेनात

लातूर : प्रतिनिधी
हमीभाव खरेदी केंद्र सुरू होऊन १० ते १२ दिवसाचा कालावधी लोटला तरी लातूरच्या आडत बाजारात मोठया प्रमाणात सोयाबीनची आवक होत आहे. सोयाबीनची आवक वाढल्याने दरात मात्र कमालीची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतक-यांना सरासरी प्रतिक्विंटल मागे ५०० ते ६०० रूपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
जिल्हयात ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या. या मध्ये ४ लाख ९० हजार ९०६ हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधीक पेरा झाला आहे. सोयाबीन या पिकांची काढणी होऊन या शेतमालाची आडत बाजारात आवक सुरू झाली आहे. सोयाबीन या शेतमालास चांगला दर मिळावा म्हणून हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. त्यामुळे लातूरच्या आडत बाजाराचा ताण कांहीसा कमी झाला असला तरी सोयाबीनच्या दरात म्हणवी तशी वाढ झाली नाही. हमी भाव खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी आडत बाजारात सोयाबीन या शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत आहे. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
सोयाबीन या पिकाकडे शेतकरी नगदी पिक म्हणून पाहतात. खरीप हंगामातील सोयाबीनची सध्या मळणी करून शेतकरी सोयाबीन हा शेतमाल आडत बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. शनिवारी लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनची २५ हजार ९३२ क्ंिवटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला सर्वाधिक ४ हजार ५७० रूपये दर मिळाला. सर्वात कमी ३ हजार ७०० रूपये दर मिळाला. तर सर्वसाधारण ४ हजार ३७० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. केंद्र शासनाने सोयाबीनला ४ हजार ८९२ रूपये प्रमाणे प्रतीक्विंटल हमीभाव जाहिर केला आहे. आडत बाजारात सोयाबीन विक्रीस घेवून येणा-या शेतक-यांना हमीभावाच्या तुलनेत सरासरी ५०० ते ६०० रूपयांचा आर्थिक फटका बसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR