24.5 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूरहमी भावापेक्षा कमी दरामुळे शेतक-यांत संताप

हमी भावापेक्षा कमी दरामुळे शेतक-यांत संताप

शिरुर अनंतपाळ :  शकील देशमुख
शेतक-यांंचे आर्थिक गणित अवलंबून असलेल्या सोयाबीनचे भाव बाजारात हमीभावापेक्षा कमी झाले असून त्यात सध्या भाव वाढ होईल, असे दिसत नसल्यामुळे सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नाही परिणामी शेतक-यांंमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून सोयाबीनच्या पडलेल्या दरामुळे सोयाबीन उत्पादक शेतक-यांचीचिंता वाढली आहे.
    गेल्या तीन दशकांपासून सोयाबीन हे शेतक-यांंचे मुख्य पीक झाले आहे. या पिकावरच शेतक-यांंची आर्थिक भीस्त असते. सोयाबीन लागवडीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे मात्र त्या बदल्यात सोयाबीनचे भाव वाढणे अपेक्षित असताना सोयाबीनचे दर खाली पडत असल्यामुळे सोयाबीन  लागवडीतून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
दरम्यान नगदीचे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. तालुक्यात सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कोरडवाहू शेतक-यासह बागायतदार शेतकरीही सोयाबीनकडे नगदी पिक म्हणून पसंती दिली. घरी साठवलेले सोयाबीन गरजेनुसार योग्य भाव आल्यानंतर शेतकरी सोयाबीन विकायला काढतात. मात्र यंदा सातत्याने सोयाबीनच्या दरामध्ये घसरण होत असल्यामुळे अनेक दिवस सांभाळलेल्या सोयाबीन कमी दरात विकावे की योग्य भाव येईपर्यत  सांभाळावे लागेल असा प्रश्न सर्वसामान्य सोयाबीन उत्पादक शेतक-यांना पडला आहे.
   सोयाबीन मुळे शेतक-यांचे आर्थिक गणित जुळत असल्याने गेली अनेक वर्षापासून मुग उडीद या खरीप पिकांना फाटा देऊन शेतक-यांनी सोयाबीन लागवडीकडे आपला मोर्चा वळविला खरा मात्र वाढलेला लागवड खर्च पाहता हमी भावाची रक्कम देखील कमी असताना आता बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकावे लागत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
सध्या सोयाबीनचे पडलेले भाव पाहता यंदा सोयाबीनची अवस्था तर एकदम बिकट होणार आहे. त्यामुळे सरकारने शेतक-याच्या लागवड खर्चाचे गणित लावून त्यावर नफा ठरवून सर्व सोयाबीन खरेदी करावे तरच शेतक-यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा सोयाबीन उत्पादक शेतकरी करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR