23 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeराष्ट्रीयहरियाणात फोगटसह ३१ जणांना उमेदवारी

हरियाणात फोगटसह ३१ जणांना उमेदवारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत काँग्रेसने ३१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीनुसार काँग्रेसने विनेश फोगटला जुलाना मतदारसंघातून उमेदवारी दिली तर लाडवा मतदारसंघातून काँग्रेसने मेवा सिंह यांना तिकीट दिले. मेवा सिंह यांची लढत मुख्यमंत्री नायब सैनी यांच्याशी होणार आहे. माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांना गढी सांपला-किलोई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. याशिवाय हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदयभान यांना होडल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.

उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीचे सत्र सुरू होते. आजही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत विनेश फोगटसह ३१ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला काँग्रेस अध्यक्षांसह काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, भूपेंद्रसिंह हुड्डा तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे विनेश फोगटने आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. लगेचच तिला उमेदवारी देण्यात आली.

काँग्रेस-आपमध्ये मतभेद
एकीकडे काँग्रेसने ३१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असली तरी दुसरीकडे इंडिया आघाडीतील आप आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपासून मतभेद असल्याचे पुढे आले आहे. आम आदमी पक्षाने हरियाणात ७ जागांची मागणी केली. मात्र, काँग्रेस आपला केवळ तीन-चार जागा देण्यास तयार आहे. याशिवाय काँग्रेसने आपला ज्या जागांचा प्रस्ताव दिला, त्या शहरी भागातील जागा आहेत, जिथे भाजप मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे मतैक्य झालेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR