24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरहर्षवर्धन पाटील विधानसभेचे तिकीट न मिळाल्यामुळे भाजपमध्ये गेले : सुशीलकुमार शींदे

हर्षवर्धन पाटील विधानसभेचे तिकीट न मिळाल्यामुळे भाजपमध्ये गेले : सुशीलकुमार शींदे

सोलापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे काही स्वतःहून भारतीय जनता पक्षात गेलेले नाहीत, तर विधानसभेचे तिकीट न मिळाल्यामुळे ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्या तिकिटासाठी मी दिल्लीत हायकमांडकडे भरपूर प्रयत्न केले होते, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. शिंदे यांच्या या वक्तव्यावर हर्षवर्धन पाटील यांनीही हसून दाद दिली.

राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा मनोरमा परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी रंगली होती. लोकसभेच्या तापलेल्या आखाड्यातही सोलापूरकरांना राजकीय मेजवानी अनुभवता आली. हर्षवर्धन पाटील यांनी कोणामुळे काँग्रेस सोडली हे जगजाहीर आहे. विधानसभेचे तिकीट पाटील यांना का मिळू शकले नाही, हेही राज्याने अनुभवले आहे. त्यामुळे शिंदे यांना नेमके काय म्हणायचं आहे, याची चर्चा रंगू लागली आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्यावर भाजप हायकमांडने विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपवासी झालेल्या पाटील यांच्याकडे अमित शाह यांनी थेट केंद्रीय पातळीवरील राष्ट्रीय साखर महासंघाची धुरा सोपवली आहे. तसेच, एनसीडीसीच्या संचालक मंडळावर पाटील कार्यरत आहेत, त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे साखर उद्योगात सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी तोच धागा पकडून हर्षवर्धन पाटील हे एक अभ्यासू मंत्री म्हणून माझ्या मंत्रिमंडळात होते. त्यांचा सल्ला अनेकजण घ्यायचे. हे काही स्वतःहून भाजपमध्ये गेले नाहीत. दिल्लीत त्यांच्या तिकिटासाठी मीही खूप प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना २०१९ मध्ये इंदापूर विधानसभेचे तिकीट मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी भाजपचा रस्ता धरला. शिंदे यांच्या विधानाला हर्षवर्धन पाटील यांनीही हसून दाद दिली.
दरम्यान, मनोरमा परिवाराचे श्रीकांत शिंदे यांनी सुशीलकुमार शिंदे यांना उद्देशून ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’,असे विधान केले. हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख करत ‘तेवढे एक वाक्य मला ऐकू आले नाही. तेवढे सोडून सगळं मान्य’ असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

सुशीलकुमार शिंदे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश कोणत्या परिस्थितीत झाला आहे, हे सांगितल्याने २०१९ मधील त्या घटनेला उजाळा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच पाटील यांच्या मुलांनी पत्रकार परिषद घेऊन आमचा तीन वेळा विश्वासघात झाला आहे. (अजित पवारांचे नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला होता) विधानसभेला आमचे काम करणाऱ्यांनाच आम्ही लोकसभेला मदत करू, असे जाहीरपणे सांगितले होते, त्यामुळे पाटील यांचा भाजप प्रवेश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR