एफबीआयची साथ, पंतप्रधान मोदींचा १६ देशांशी संवाद
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर यामागे पाकिस्तानचा हात भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णायक कार्यवाही सुरु केली आहे. भारताने परदेशी सरकारांसमोर तांत्रिक आणि मानवी खब-यांबाबत मिळालेले गुप्तचर पुरावे सादर केले आहेत. यात हल्ल्यामागे थेट पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनांचा रोल असल्याचे पक्के पुरावे आहेत. त्यामुळे भारताला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ देशांच्या प्रमुखांशी थेट संवाद साधला आहे. दरम्यान, अमेरिकेची गुप्तचर संघटना एफबीआयनेही भारताचे समर्थन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ दिवसांत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान, इस्रायल, इटली, इजिप्त, जॉर्डन, सौदी अरब, नेपाळ, मॉरिशस, डच, ऑस्ट्रेलियासह १६ देशांच्या प्रमुखांशी संपर्क साधला आहे. सर्व नेत्यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध व्यक्त केला आणि भारताला पाठिंबा दिला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीदेखील परराष्ट्र मंत्री आणि डिप्लोमॅटिक अधिका-यांशी संवाद साधत भारताची बाजू मांडली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा हल्ला भयानक असल्याचे म्हटले. तसेच इराण आणि सौदी अरेबियाने भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली. तसेच फ्रान्स, इस्रायल, जपान, इटलीसह अनेक देशांनी दहशतवादाविरुद्ध भारतासोबत उभे आहोत, असे आश्वासन दिले आहे.
डिप्लोमॅटिक अधिका-यांशी
परराष्ट्र मंत्रालयाचा संवाद
दिल्लीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांनी ३० हून अधिक देशांच्या डिप्लोमॅटिक अधिका-यांशी भेट घेत भारतात परदेशी पर्यटक संपूर्ण सुरक्षित असल्याचे आश्वस्त केले.