लातूर : प्रतिनिधी
स्थानिक बेरोजगारांना मोठ्या संख्येने रोजगार देण्याचे गाजर दाखवून रेल्वे बोगी कारखाना उभारण्यात आला. त्याचे एकदा नव्हे चारवेळा उद्घाटन करण्यात आले. मात्र, कारखान्यातून ना बोगी बाहेर पडली किंवा रोजगाराची उपलब्धता झाली. त्यामुळे हा बोगी कारखाना आहे, की बोगस कारखाना आहे, हे कळत नाही. याबद्दल लोकांनीच आता सत्ताधा-यांना जाब विचारावा लागेल, अशी टीका लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील समदर्गा व कोरंगळा (ता. औसा) येथे आमदार देशमुख यांनी शुक्रवार दि. १४ सप्टेंबर रोजी ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या धोरणाला शेतकरी, महिला व तरुण वैतागले आहेत. भाव वाढणार म्हणून सोयाबीनची थप्पी घरी किती दिवस ठेवायची. जाहिरातबाजीच्या माध्यमातून केवळ विकासाचे चित्र रंगवायचे सरकारचे धोरण आहे. जनतेच्या पैशातून जाहिरातीसाठी पगारी योजना दूत नेमले जात आहेत. राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असताना शेतीमालाला भाव नाहीत, रोजगार नाही, नोकरभरती नाही, महागाई वाढली आहे, जीएसटीतून पिळवणूक केली जाते, महिला सुरक्षित नाहीत. याबद्दल येणा-या निवडणूकीत सत्ताधा-यांना प्रश्न विचारला पाहिजे. पंधराशे व दोन हजारांचे आमिष दाखवून बोळवण केली जात आहे. तात्पुरता विचार न करता भविष्याचा विचार करून आपल्या हक्कासाठी व शाश्वत रोजगारासाठी सजग राहून हित जोपसणारे सरकार निवडले पाहिजे, असे आमदार देशमुख म्हणाले.
कोरंगळा येथील जिल्हा परिषद शाळांतील नवीन सात वर्गखोल्या बांधकामासाठी पाठपुरावा केला. यामुळे ६१.५० लाखाचा निधी मंजूर झाला. विविध योजनांच्या माध्यमातून गावाच्या विकासकामात योगदान देता आले, याचे समाधान आहे. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार संविधान सभागृह, समाज मंदीर संरक्षक भिंत, रस्त्यांची दुरुस्ती आदी कामे तातडीने पूर्ण करु, अशी ग्वाही आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दिली. समदर्गा येथे महिलांसाठी सभागृह, हनुमान मंदीर येथील सभामंडपाच्या दुरुस्तीचे काम करू, असेही यावेळी त्यांनी आश्वस्त केले. या वेळी सचिन दाताळ, अनुप शेळके, सदाशिव कदम, महेंद भादेकर, चौधरी, रघुनाथ शिंदे, शिवप्रसाद शिंदे, मधुकर कदम, मधुकर शिंदे, जगन्नाथ ढोक, भागवत गरगडे, जालींदर ढोक, राजेंद्र शिखरे, सहदेव जंगाले, ज्ञानदेव जंगाले, तुराब शेख, नवनाथ पवार, सतीश भिसे, युवराज ढोक, सुग्रीव पाटील, संजय ढोक, किरण ढोक, नवनाथ कसबे, सुमीत कसबे, गोविंद ढोक, गणेश ढोक व ग्रामस्थ उपस्थित होते.