अहिल्यानगर : प्रतिनिधी
महाराष्ट्रात मराठी माध्यमातील पहिली ते पाचवीच्या शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा केवळ चुकीचा नाही, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर आणि मराठी संस्कृतीवर हल्ला असल्याची तीव्र प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सचिव डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार राज्यात पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा शासन निर्णय गेल्या बुधवारी जारी करण्यात आला. त्यावर डॉ. अजित नवले यांनी प्रतिक्रिया दिली.
हिंदी भाषेबद्दल व इतर सर्वच भाषांबद्दल आम्हाला आदरच आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये मराठी सोडून इतर कोणत्याही भाषेची सक्ती करणे अयोग्य असून हिंदीबाबत करण्यात आलेली सक्ती सरकारने तातडीने मागे घ्यावी, अशी मागणीही यावेळी डॉ. अजित नवले यांनी केली आहे. तसेच, एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा व दुसरीकडे महाराष्ट्रात हिंदी भाषा पहिलीपासून विद्यार्थ्यांना अनिवार्य करायची हे केवळ संतापजनक नसून निषेधार्ह सुद्धा आहे, असेही डॉ. अजित नवले यांनी सांगितले.
भाजपा याद्वारे आपला द्वेषमूलक, मतदानकेंद्री व विभाजनवादी अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदी भाषेच्या सक्तीची खेळी खेळली गेली असल्याचा आरोपही डॉ. अजित नवले यांनी केला आहे.
…म्हणून ‘एक देश एक भाषा’ हे धोरण
भारत हा विविध भाषा, संस्कृती व परंपरांनी नटलेला देश आहे. भाषा, संस्कृती व परंपरांमधील हे वैविध्य आपल्या देशाला समृद्ध करत आले आहे. मात्र भाजपा व संघ परिवाराला, हे ‘विविधतेत एकता’ हे तत्त्व मान्य नसल्याने त्यांना देशातील विविध भाषा, संस्कृती व परंपरांना सुरुंग लावून त्यात एकारलेपणा आणावयाचा आहे.
राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा :
राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा आपला निर्णय या पार्श्वभूमीवर तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात येत असून सरकारने जनतेची भावना व न्याय लक्षात घेऊन सक्ती मागे न घेतल्यास या विरोधात राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी डॉ. अजित नवले यांनी दिला.