33.3 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रहिंदी सक्ती सरकारने घेतली मागे;राज ठाकरेंकडून महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन

हिंदी सक्ती सरकारने घेतली मागे;राज ठाकरेंकडून महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन

मुंबई : राज्य शिक्षण आराखड्यानुसार राज्य सरकारने तृतीय भाषा म्हणून इयत्ता पहिली ते चौथीसाठी हिंदी भाषा अनिवार्य असणार आहे असा शासन निर्णय काढला होता. यानंतर सर्व स्तरांतून सतत होत असलेल्या टीकेनंतर हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल, असे स्पष्ट केले असून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीच याबाबतची घोषणा आज केली आहे. या घोषणेनंतर राज ठाकरे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी, महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिलीपासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली! यासाठी तमाम महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून अभिनंदन. सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती, असा टोला सरकारला लगावला आहे.

ज्या महाराष्ट्राने अवघ्या देशावर राज्य केले पण ते करताना कधी दुस-या प्रांतावर मराठी लादली नाही, त्या प्रांतावर तुम्ही हिंदी भाषेची सक्ती कसली लादत होतात? यातून नक्की काय साध्य करायचं होतं? असा प्रश्न त्यांनी केला. असो, ही सक्ती मागे घेतली हे उत्तम झालं. पण या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रातील सगळ्या विचारधारांचे लोक उभे राहिले याबद्दल सर्वांचे अभिनंदन.

मराठी माणूस जर भाषेसाठी किंवा महाराष्ट्राच्या विरोधात कुरघोड्या करणारांच्या विरोधात असाच उभा राहिला तर काय बिशाद आहे कोणाची मराठी माणसाला गृहीत धरण्याची. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर कायम मराठी माणूस आणि भाषेसाठी उभी राहिली आहे. यावेळेस दाखवलेली एकजूट कायम दिसू दे. सरकरने हा निर्णय मागे घेतला, त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण आले. पण ठीक आहे निर्णय घेतला यासाठी सरकारला धन्यवाद. पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही, महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी इशारा देखील दिला आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR