नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हिंदुजा ग्रुपची कंपनी हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सवर सुमारे २,५०० कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप आहे. सुमारे ९ महिने चाललेल्या तपासानंतर आयकर विभागाने अंतर्गत अहवालात हा आरोप केला आहे.
प्राप्तिकर विभागाने या महिन्याच्या सुरुवातीला संबंधित अंतर्गत अहवाल सादर केला. गेल्या नऊ महिन्यांपासून विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तपासादरम्यान, प्राप्तिकर विभागाला असे आढळून आले की ऌॠर ने कर चुकवण्यासाठी तोट्यात चालणा-या संस्थेचे विलीनीकरण केले.
हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सने आपला आरोग्यसेवा व्यवसाय बेटेन बीव्हीच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांना विकला होता. जो बेअरिंग प्रायव्हेट इक्विटी एशियाशी संबंधित फंड आहे. नंतर हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सचा डिजिटल मीडिया आणि कम्युनिकेशन व्यवसाय युनिट ‘एनएक्सटी’ डिजिटलमध्ये विलीन करण्यात आला.
आयकर विभागाचे म्हणणे आहे की, एनएक्सटी डिजिटल ही तोट्यात चालणारी कंपनी होती आणि हे विलीनीकरण पूर्णपणे कर वाचवण्यासाठी करण्यात आले होते. इकॉनॉमिक टाइम्सने आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिका-याच्या हवाल्याने सांगितले की, तपास पूर्ण झाला आहे. विलीनीकरणाचा उद्देश केवळ कर वाचविण्याचा होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
दुसरीकडे, कंपनीने अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे. कंपनीचे असे मत आहे की ज्या विलीनीकरणाबाबत बोलले जात आहे ते पूर्णपणे नियम आणि कायद्यानुसार आहे.