28.6 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeसंपादकीय विशेषहुकमी बालकलाकार

हुकमी बालकलाकार

१९६०-७० च्या दशकात बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालणारे नईम सय्यद ऊर्फ ज्युनिअर मेहमूद (वय ६८) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ज्युनियर मेहमूद यांच्यातील अभिनयक्षमता उत्तम असली तरी पठडीबाज भूमिका मिळत गेल्याने त्यांचे अभियनगुण तितक्या प्रभावीपणाने समोर आले नाहीत. अर्थात, आपल्या कारकीर्दीत त्यांनी तत्कालीन काळातील आघाडीच्या कलाकारांसमवेत काम केले. आघाडीचे विनोदी कलाकार मेहमूद यांनी तर नईम यांना पट्टशिष्य करून ज्युनिअर मेहमूद अशी उपाधी दिली. आज चित्रपटातून निखळ विनोद हरवलेला असताना हुकमी बालकलाकार म्हणून नावाजलेल्या ज्युनिअर मेहमूद यांनी प्रेक्षकांना विनोदरूपी दिलेली मेजवानी निश्चितच अविस्मरणीय ठरते.

दी सिनेसृष्टीत नायक, नायिका, खलनायक, सहनायक, सहनायिका यांच्याबरोबरीने अन्य व्यक्तिरेखा साकारणा-या अनेक कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यांची चित्रपटातील उपस्थिती प्रेक्षकांना सुखावून जायची. कथानकामध्ये त्यांच्या व्यक्तिरेखेला असणारे महत्त्व भलेही कमी असेल पण आपल्या अभिनयातील वेगळेपणामुळे हे कलाकार प्रेक्षकांच्या चिरकाळ स्मरणात राहिले. त्यातही विनोदी धाटणीच्या कलाकारांना विशेष पसंती मिळाली. जॉनी लिव्हर, ओम प्रकाश, मेहमूद, जॉनी वॉकर अशी काही यातील आघाडीची नावे. याच नामावलीतले एक नाव म्हणजे ज्युनिअर मेहमूद. त्यांचे मूळ नाव नईम सय्यद. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबईच्या वडाळा येथील रेल्वे कॉलनीत झाला. वडील मसूद अहमद सिद्दीकी हे रेल्वेत मोटरमन होते. चित्रपटाचे वेड त्यांना त्यांच्या भावामुळे लागले. मोठे भाऊ मोहंमद बिलाल हे चित्रपटात स्टिल फोटोग्राफी करत असत. ते मिमिक्री आर्टिस्ट होते आणि अभिनय करण्याची आवड हाती. शूटिंगच्या वेळी ते सर्व नायकांशी बोलायचे. घरी आल्यानंतर मोठे बंधू चित्रपट सेटवरील किस्से सांगायचे. ते ऐकून सय्यद यांना आपण या कलाकारांसारखे कधी होऊ, असे सारखे वाटायचे.

एक दिवस त्यांच्या भावाने नईम सय्यद यांना शूटिंग पाहण्यासाठी नेले. ‘कितना नाजूक है दिल’ या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. त्यात जॉनी वॉकर काम करत होते. शूटिंगमध्ये एक बालकलाकार आपला संवाद सारखा विसरत होता. परंतु तेथे हजर असलेल्या नईम सय्यद याच्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडले, ‘अमा, इतनी सी लाईन नही बोल पा रहा और आ गया अ‍ॅक्टिंग करने’ हा संवाद दिग्दर्शकाने ऐकला आणि त्यांनी नईमला काम करण्याचे आव्हान दिले. त्यावेळी नईमने एका टेकमध्ये शॉट ओके केला. लोकांनी टाळ्या वाजविल्या आणि पाच रुपये मिळाले. तेव्हा ते आठ वर्षांचे होते. त्याकाळात पाच रुपये म्हणजे मोठी रक्कम होती. यानंतर नईम यांचे आयुष्य बदलून गेले. त्यांच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले. शाळेत अभ्यास करण्याऐवजी अभिनेत्यांची नक्कल करणे हा त्याचा छंद होता. याच छंदाने नईमसाठी नशिबाची दारे नेहमीसाठीच उघडली. काही काळानंतर त्याला ‘सुहागरात’ या चित्रपटात काम मिळाले.

यात राजश्री, जितेंद्र आणि मेहमूद हे नामवंत कलाकार होते. या शूटिंगच्या काळात मेहमूद यांच्या मुलीच्या वाढदिवसाची पार्टी होती. तेव्हा नईमने स्टेजवर मेहमूद यांच्या ‘हम काले है तो क्या हुआ दिलवाले है’, या गाण्याने धूम उडवून दिली. पुढच्याच दिवशी मेहमूद यांनी त्याला रणजित स्टुडिओत बोलावले आणि शिष्य केले. नईम यांचे ज्युनिअर मेहमूद असे नामकरण केले. ‘सुहागरात’च्या सेटवर ज्युनिअर मेहमूद यांना जी. पी. सिप्पींच्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाची माहिती मिळाली. त्यांना दहा-बारा वेंधळी मुले हवी होती. त्यांना काम मिळाले. प्रदर्शनाच्या दिवशी शुक्रवारी ‘ब्रह्मचारी’चे चार खेळ झाले आणि ज्युनिअर मेहमूदचे नाव घराघरांत पोचले. ते एका रात्रीतून स्टार चाईल्ड आर्टिस्ट म्हणून नावारूपास आले. एक काळ असा होता की त्याच्याकडे इम्पोर्टेड मोटार होती. तत्कालीन काळात ती निवडक कलाकारांकडेच असायची.

ज्युनिअर मेहमूद यांच्या अभिनयात कसदारपणा होता आणि त्यामुळे त्यांच्या स्टारडमचा काळ सुरू झाला. त्यावेळी बालकलाकार ही चित्रपटांची गरज असायची. ‘ज्युनिअर’ उपाधी आणि बालकलाकार असतानाही एखाद्या प्रसिद्ध कलाकाराप्रमाणे नाव होणे हे ज्युनिअर मेहमूद यांच्या कलेची आणि अभिनयक्षमतेची कमाल होती. त्यांच्या उपस्थितीने चित्रपटातील वातावरण बदलून जायचे. अभिनयाच्या जोरावर त्यांनी फिल्मफेअर आणि नॅशनल अवॉर्डही जिंकले. ज्युनिअर मेहमूद यांच्यानंतरच्या काळात बेबी नाझ, मास्टर राजू, मास्टर रवी, मास्टर सचिन, ज्युनिअर अमिताभ म्हणजेच मास्टर मयुर, मास्टर जावेद, बेबी गुड्डू, मास्टर बिट्टू, मास्टर बंटी यासारख्या बालकलाकारांनी चित्रपट विश्व व्यापून टाकले होते. परंतु ज्युनिअर मेहमूद यांच्याइतकी लोकप्रियता आणि स्थान त्यांना मिळवता आले नाही. ब्रह्मचारी, दो रास्ते, आन मिलो सजना, बॉम्बे टू गोवा, गुरु और चेला, हाथी मेरे साथी, कटी पतंग, जोहर मेहमूद इन हाँगकाँग, हरे रामा हरे कृष्णा यासारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्युनिअर मेहमूद यांनी आपल्या कारकीर्दीत काही मराठी चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. त्यांनी अमिताभ बच्चन, राज कपूर, राजेश खन्ना, शम्मी कपूर, मेहमूद यासारख्या महान कलाकारांसमवेत काम केले आणि नावलौकिक मिळवला. आजही त्या काळातील मुले आणि प्रेक्षक हे ज्युनिअर मेहमूदला विसरलेले नाहीत.

ज्युनिअर मेहमूद यांना त्यांचे वडील एक गोष्ट नेहमी सांगायचे, की आयुष्यात यशाचा कधीही अहंकार करू नये आणि कोणाचेही शाप, तळतळाट घेऊ नयेत. कारण आशीर्वादापेक्षा शाप लवकर लागतो. ज्युनिअर मेहमूद यांनी एका मुलाखतीत बोलताना आपल्या यशाचे श्रेय आईवडिलांना असल्याचे सांगितले. तसेच गुरु भाईजान (मेहमूद) यांनी नाव दिले नसते तर आपण काहीच करू शकलो नसतो, असेही ज्युनिअर मेहमूद म्हणाले होते. ज्युनिअरच्या पुढचे मेहमूद हे नाव काढून टाकले तर आपले अस्तित्व काहीच नसेल, असेही ते म्हणायचे. तत्कालीन काळात ज्युनिअर मेहमूद हे इम्पाला मोटार चालवायचे. जे काही मिळाले ते अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचे ते म्हणत. त्यांनी भारतात असंख्य ठिकाणी स्टेज शो केले. ‘तेनाली रामा’ या मालिकेमध्ये त्यांनी शेवटचे दर्शन दिले. चित्रपट आता पूर्वीसारखे होत नाहीत. पूर्वी चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात राहायचे. आज दोन तासांचा चित्रपट पाहतो आणि पॉपकॉर्न खाऊन तेथेच विसरतो. ज्युनिअर मेहमूद यांच्या जाण्याने बॉलिवूडनगरी अणि चाहते हळहळले. चित्रपट ‘ब्रह्मचारी’मध्ये ‘हम काले है तो क्या हुआ दिलवाले है’ या गाण्यावरचे त्यांचे नृत्य हे नेहमीच स्मरणात राहील.

-सोनम परब

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR