वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
आधीच टॅरिफच्या मुद्द्यावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जनतेकडून विरोध होत असताना आता हार्वर्ड विद्यापीठ प्रशासन आणि प्राध्यापक, कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यापीठाचे अध्यक्ष एलन. एम. गार्बर यांनी ट्रम्प प्रशासनाकडून गैरमार्गाने विद्यापीठावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी विद्यापीठाचा निधी थांबवण्याची धमकी दिली होती. प्रशासनाने स्थगिती दिल्यानंतर आता हार्वर्ड विद्यापीठाने थेट न्यायालयात ट्रम्प सरकारविरोधात खटला भरला आहे. त्यामुळे अमेरिकेत नवा संघर्ष यानिमित्ताने उफाळून आला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले होते की, हार्वर्ड विद्यापीठ मुर्खांची आणि द्वेष पसरवणा-यांची जागा बनली आहे. हे विद्यापीठ डाव्यांचा (कम्युनिस्ट) गड असल्याचे सांगितले जाते. २३ ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलने गाझा पट्टीत हल्ले केले होते. त्यावेळी हार्वर्ड विद्यापीठात त्याविरोधात आंदोलन झाले होते.
सरकारकडून विद्यापीठाला दिल्या जाणा-या निधीसंदर्भात ट्रम्प प्रशासनाने मोठा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या प्रशासनाने हार्वर्डला दिल्या जाणा-या २.२ बिलियन निधीला स्थगिती दिली. त्यानंतर विद्यापीठ आणि ट्रम्प प्रशासन आमने-सामने आले आहे.
हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी ट्रम्प प्रशासनाविरोधात एकवटले आहेत. विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. हार्वर्ड विद्यापीठाने आता ट्रम्प प्रशासनाला कोर्टामध्ये खेचले आहे.