28.3 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रहो, मी नाराज !

हो, मी नाराज !

नाशिक : प्रतिनिधी
मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा कालपासून रंगत होत्या. अखेर आज (१६ डिसेंबर) त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांची नाराजी उघड केली. भुजबळ म्हणाले, मी नाराज आहे. पुढे काय? ज्यांनी मला डावलले त्यांना तुम्ही (प्रसारमाध्यमं) प्रश्न विचारायला हवेत .
दरम्यान, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे (अजित पवार) आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळल्याने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे.

छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आले की तुम्हाला पक्षाने, महायुतीतील नेत्यांनी मंत्रिपदापासून का डावलले? त्यावर भुजबळ म्हणाले, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय नि फेकले काय कोणाला काय फरक पडतो. आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आले आणि किती वेळा गेले, परंतु हा छगन भुजबळ संपला नाही. तुम्ही मंत्रिपदावरून मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावलले त्यांना विचारायला हवे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजित पवारांच्या अभिनंदनाचे, नव्या मंर्त्यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग ठिकठिकाणी लागले आहेत. त्यावर भुजबळांचा फोटो छापलेला नाही. त्यावरून भुजबळांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, कधी कधी होर्डिंगवर जागा नसते.

दरम्यान, त्यांना विचारण्यात आले की तुम्ही पक्षावर नाराज आहात का? यावर भुजबळ म्हणाले, होय, मी नाराज आहे. पुढे काय करणार? मी पुन्हा सांगतो मी नाराज आहे. यावर त्यांना विचारण्यात आले की तुमचे अजित पवार (पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष), सुनील तटकरे (पक्षाचे प्रदेशाध्यक्ष) यांच्याशी काही बोलणे झाले आहे? यावर भुजबळ म्हणाले, मला त्याची काही आवश्यकता वाटली नाही.

समर्थकांनी रस्ता रोको
येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील विंचूर इथे छत्रपती संभाजीनगर-नाशिक राज्य मार्गावर अर्धा तासच्या भुजबळ समर्थकांनी रस्ता रोको आंदोलन केले. भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्याचा निषेध समर्थकांनी केला. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. बुलडाणा इथल्या सिंदखेडराजा इथं ओबीसी समाजाच्यावतीने शहरातून मोर्चा काढत नागपूर-पुणे या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR