कल्याण : प्रतिनिधी
काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये अवघ्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याचदरम्यान, विशाल गवळीच्या बहिणीने विशाल गवळीच्या आत्महत्येनंतर पोलिस प्रशासनावर संशय व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, ‘माझा भाऊ १०० किलो वजनाचा माणूस होता. तो जेलमध्ये टॉवेलच्या साहाय्याने कशाप्रकारे आत्महत्या करेल, हे असं होऊच शकत नाही.
विशाल गवळी याला नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याने आज रविवारी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान तुरुंगातील शौचालयात जाऊन गळफास लावून घेतला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. सध्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तर विशाल गवळी याचा मृतदेह दक्षिण मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पोलिस प्रशासन हे आतमध्ये काय करत होते? कोणत्या प्रकारचं प्रोटेक्शन देण्यात आलं होतं? राजकीय बल असताना हे कसं काय घडणार?’, असा सवाल विशाल गवळीच्या बहिणीने विचारला आहे.
रात्री माझ्या भावजयीला पीडित मुलीच्या बापाने रात्रभर शिव्या दिल्या. तिथे स्थानिक नागरिक जे मनपामध्ये काम करायला जातात, त्यांना देखील तो सांगतोय की, मला एकनाथ शिंदेंचा सपोर्ट आहे. मी वरपर्यंत फोन करेन. पोलिस देखील आम्हाला मदत करत नाहीत. आम्ही १० वाजता रात्री पोलिस स्टेशनला गेलो. ते सांगतोय की, आम्ही त्यांना सपोर्ट करू पण तुम्हाला नाही, असं गंभीर असे आरोप देखील विशालच्या बहिणीने पोलिस प्रशासनावर केले आहेत.
दरम्यान, विशाल गवळीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर मृत मुलीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. मुलीच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या फोटोला हार घालत आणि त्याच्यासमोर दिवा लावून पूजा केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘आमच्या दीदीसोबत नराधमाने जे कृत्य केले, त्यासाठी आम्ही कोर्टात लढत होतो. विशाल गवळीने जे काही कृत्य केले, त्याची शिक्षा त्याला देवाने दिली. त्याच्यासोबत ‘जशास तसा’ न्याय झाला. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. पोलिसांनीही आम्हाला खूप सहकार्य केले आणि पाठिंबा दिला. मी त्यांचाही आभारी आहे. प्रशासनाने चांगलं काम केलं आहे, असे पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटले.