परभणी : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२४ रोजी कन्यारत्नाला जन्म देणा-या एका कुटुंबास येथील जिलेबी विक्रेते धरमवीरसिंह दामोदर यांच्याकडून २ ग्रॅम सोन्याचे नाणे व २ किलो जिलेबी भेट देण्यात येणार आहे. परभणी शहरातील आर.आर.टॉवरच्या बाजूला त्यांचे जिलेबीचे छोटेसे दुकान आहे.
मागील १२ वर्षांपासून धरमवीरसिंह व त्यांचा मुलगा सन्नीसिंह हा अनोखा उपक्रम राबवत आहेत. जिल्हा रुग्णालयात १ जानेवारीला जन्माला येणा-या मुलींच्या कुटुंबांसाठीच हा उपक्रम राबविला जातो. लकी ड्रॉ काढून एका मुलीच्या कुटुंबाला हे नाणे देण्यात येणार आहे. तर खाजगी रुग्णालयातील मुलींच्या कुटुंबांना केवळ २ किलो जिलेबी भेट देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस अधिक्षक रागसुधा आर., जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागेश लखमावार, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, एम. एस. मोरे आदींची उपस्थिती राहणार आहे.
दुकानाचे चालक धरमवीरसिंह व त्यांचा मुलगा सन्नीसिंह हे दोघेजण या ठिकाणी जवळपास मागील ४० वर्षांपासून आपले जिलेबीचे दुकान चालवतात. मागील दहा – अकरा वर्षापुर्वी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्त्रीभ्रूणहत्येची प्रकरणे गाजत होती. त्यामुळे मुलगा आणि मुलींच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाल्याचे दिसून आले. यासाठी एक छोटासा समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा त्यांनी निश्चय केला आणि १ जानेवारी रोजी जन्माला येण-या मुलींसाठी जिलेबी भेट देण्याचा निश्चय त्यांनी केला.
तेव्हापासून आजतागायत १ जानेवारी या वर्षाच्या पहिल्या दिवशी कन्यारत्नास जन्म देणा-या कुटुंबाला २ किलो जिलेबी भेट देण्याचा उपक्रम त्यांनी न चुकता राबवला आहे. यावषीर्ही एका भाग्यवान कुटुंबाला त्यांच्याकडून २ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे नाणे देखील भेट स्वरुपात देण्यात येणार आहे.