मुंबई :
भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच फॉरमॅटमध्ये खेळतायत. मात्र पुढील वर्षी होणा-या आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्डकपसाठी दोघांनीही आपली तयारी आणि लक्ष्य स्पष्ट केले आहे. २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणा-या या मोठ्या स्पर्धेपूर्वी टीम इंडिया घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सिरीजने नव्या सिझनची सुरुवात करणार आहे.
या सिरीजपूर्वी ‘जिओस्टार’शी बोलताना विराट कोहलीने २०२७ च्या वर्ल्डकपसंदर्भात त्याची भूमिका स्पष्ट केली. भारतासाठी हा आपला शेवटचा वर्ल्डकप असेल, असे विराटने म्हटले आहे. त्यामुळे वर्ल्डकप जिंकण्यासाठी मैदानात आपले सर्वस्व पणाला लावण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला.
विराट कोहली म्हणाला, ५० ओव्हर्सच्या वर्ल्डकपचा प्रभाव इतर कोणत्याही स्पर्धेपेक्षा जास्त असतो. एका दिवसात तुम्ही अडीच टी-२० सामन्यांइतकं क्रिकेट खेळत असता. मोठ्या स्पर्धेत आणि वर्ल्डकपमध्ये १० सामन्यांपर्यंत हीच तीव्रता कायम ठेवणे मोठे आव्हान असते.
वर्ल्डकप परदेशात होणार असल्याने आव्हान आणखी वाढणार असल्याचेही विराटने सांगितले. यावेळी स्पर्धा परदेशातील होणार आहे. त्यामुळे त्याचा शरीरावर आणि मानसिकतेवरही मोठा परिणाम होतो. माझ्यासाठी भारताकडून खेळण्याचा हा शेवटचा वर्ल्डकप असेल आणि हीच माझी प्रेरणा आहे. मैदानावर आपलं सर्वस्व द्यायचं आहे. वर्ल्डकप जिंकणं हेच लक्ष्य आहे. त्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे, असे विराट म्हणाला.
रोहित शर्माचेही ‘मिशन वर्ल्डकप’ स्पष्ट
दरम्यान रोहित शर्मानेही २०२७ च्या वर्ल्डकपबाबत त्याची भूमिका स्पष्ट केली. २०२३ च्या वर्ल्डकपमध्ये भारताला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे रोहितसाठी या स्पर्धेतले अपूर्ण काम अजूनही कायम आहे. ‘जिओस्टार’शी बोलताना रोहित म्हणाला, आपलं काम पूर्ण झालं आहे, असा विचार माझ्या मनात कधीच येणार नाही. तुम्ही जोपर्यंत खेळत आहात तोपर्यंत पुढे पाहण्यासाठी काही ना काही असतंच. त्यामुळे आता वर्ल्डकप हेच माझं लक्ष्य आहे.
















