नाशिक : प्रतिनिधी
बेपत्ता असलेल्या तीन शाळकरी मुलांचे मृतदेह बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या पाण्याच्या खड्ड्यात सापडले आहेत. ही घटना नाशिकच्या पंचवटी भागात घडली आहे. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरातील विडी कामगार भागातून रविवारी तीन शाळकरी मुलं बेपत्ता झाली होती. नातेवाईकांकडून या मुलांचा शोध सुरू होता. मात्र, ते कुठे आढळून आले नाहीत. अखेर सोमवारी सकाळी परिसरातील एका खासगी बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्याच्या बाजूला या तीनही मुलांचे कपडे आणि चपला आढळून आल्या.
हे मुले आंघोळीच्या निमित्ताने पाण्यात उतरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर आडगाव पोलिस आणि नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने या ठिकाणी शोध कार्य सुरू केले. काही वेळानंतर या तीनही मुलांचे मृतदेह या खड्ड्यातील पाण्यात आढळले. खड्ड्यातील पाण्यात गाळ असल्याने या गाळात अडकून या मुलांचा मृत्यू झाला, असं प्रथमदर्शक पोलिसांनी सांगितलंय. या मुलांचे मृतदेह आढळून आल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींनी आक्रोश केला.