कॉंग्रेसने व्यक्त केली चिंता, सरकारला सवाल
वॉशिंग्टन वृत्तसंस्था
अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेने ज्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले किंवा स्टुडंट अॅण्ड एक्स्चेंज व्हिजीटर इन्फॉर्मेशन सिस्टममधून नोंदणी रद्द केली, त्यापैकी सुमारे ५० टक्के विद्यार्थी भारतातील आहेत. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला असून, केंद्र सरकार यावर ठोस पावले उचलणार का, असा सवाल उपस्थित केला आहे.
अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनने विद्यार्थी, वकील आणि विद्यापीठ कर्मचा-यांकडून या प्रकरणावर ३२७ अहवाल गोळा केले. यातून ही माहिती समोर आली. व्हिसा रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये १४ टक्के विद्यार्थी चीनचे आहेत. याशिवाय दक्षिण कोरिया, नेपाळ आणि बांगलादेशातील विद्यार्थ्यांचाही व्हिसा रद्द करण्यात आला आहे. यामध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे.
२०२३-२४ च्या आकडेवारीनुसार अमेरिकेत परदेशातील सर्वाधिक विद्यार्थी भारतातील आहेत. २०२३-२४ मध्ये ११,२६,६९० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी ३,३१,६०२ विद्यार्थी भारतातील होते. हे प्रमाण एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या २९ टक्के आहे. त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. चीनच्या विद्यार्थ्यांची संख्या २.७७ लाख आहे. ज्या विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द झाले, त्यापैकी ५० टक्के विद्यार्थी ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर होते. अर्थात, ते पदवीधर असून, ते अमेरिकेत नोकरी करीत आहेत.
ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग
एफ-१ व्हिसाची १२ महिने मुदत
ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग एफ-१ व्हिसावर अमेरिकेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना १२ महिन्यांपर्यंत काम करण्याची परवानगी मिळते. यानंतर जे विद्यार्थी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रात काम करतात, त्यांना व्हिसामध्ये आणखी २४ महिन्यांची मुदतवाढ मिळते.