शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना जाहीर करण्यात आलेल्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. कर्जमाफीच्या याद्या संथ गतीने जाहीर होत असल्याने शेतक-यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यंदा पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना हे अनुदान तातडीने मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र प्रत्यक्ष लाभ मिळण्याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने शेतक-यांची प्रतीक्षा वाढली आहे. कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होण्यास विलंब होत असल्याने अनुदान कधी मिळणार, असा प्रश्न शेतक-यांकडून उपस्थित केला जात आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात यंदा पावसाअभावी सोयाबीनसह खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. अनेक शेतक-यांच्या हाती तुटपुंजे उत्पादन आले असून रब्बी हंगामाची पेरणीही पाण्याअभावी रखडली आहे. अशा परिस्थितीत शेतीचा खर्च, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि कर्जाची परतफेड करताना शेतक-यांची आर्थिक कोंडी होत आहे. कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रोत्साहन अनुदानाच्या प्रक्रियेला गती देऊन पात्र चालु बाकीदार शेतक-यांच्या खात्यावर तातडीने रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
















