मुंबई : प्रतिनिधी
बहुचर्चित आणि विभानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी कारणीभूत ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आतापर्यंतच्या छाननीमध्ये ५ लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत. पण या अपात्र ५ लाख बहिणींनी सहा महिन्यांसाठी देण्यात आलेले सरकारचे ४५० कोटी रुपये मात्र पाण्यात गेले आहेत.
दरम्यान, या अपात्र बहिणींना जुलै ते डिसेंबर या काळात दिलेली योजनेची रक्कम परत घेतली जाणार नाही. पण या महिलांना जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार नाहीत, असेही तटकरेंनी स्पष्ट केले आहे.
कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांनी निकषांचे उल्लंघन केलं आहे, अशा जवळपास ५ लाख बहिणींना सरकारने अपात्र ठरवले आहे. मात्र, या बहिणींना योजनेअंतर्गत मिळालेले सहा महिन्यांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारने विविध सरकारी योजनांचा लाभ घेणा-या तसेच ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे अशा महिलांना या योजनेतून वगळले असल्याची माहिती महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मात्र, सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणतेही निकष न लावता ज्या ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांना सरसकट दरमहा १५०० रुपये दिले. या योजनेसाठी २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी २ कोटी ४१ लाख महिला पात्र ठरल्या आहेत. तर अद्याप ११ लाख अर्जांची छाननी बाकी आहे.