सोलापूर : इयत्ता दहावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा तर बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्यांचा बालशिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणे बंधनकारक करण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याने सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे (डायट) प्रशिक्षण दिले जात आहे.
सध्या बारावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू असून मे २०२५ पासून दहावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एप्रिलमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गावरील शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू होईल. त्यानंतर मे महिन्यात जिल्हा व तालुकास्तरीय प्रशिक्षण पार पडणार आहे. तत्पूर्वी, तीन ते सहा वर्षांच्या चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना बालशिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी अभ्यासासंबंधी व्हिडिओ असलेले संकेतस्थळ देऊन त्यावरील व्हिडिओ पाहावे लागणार आहेत.
याशिवाय त्यांना पुस्तिका देखील दिली जाणार आहे. दोन्हीकडील पाहून, वाचून सेविकांना ‘डायट’कडून दिलेल्या पुस्तिकेत उत्तरे लिहावी लागणार आहेत. त्यात उत्तीर्ण होणे फार कठीण नसणार आहे, पण नवीन धोरणानुसार अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना कशा पद्धतीने हाताळायचे आहे हे शिकवले जाणार आहे.
रंग (झाडांच्या पानांद्वारे) ओळखणे, चेंडू फेकणे व त्यातून त्याचे लक्ष केंद्रित करणे, वस्तूंच्या माध्यमातून (दगड किंवा भांडी) आकार व संख्या ओळख करणे, त्यांच्या आरोग्यासंदर्भात लक्ष देणे, खेळातून मनोरंजन करणे आणि त्यात पालकांचा सहभाग वाढविणे अशा गोष्टींचा नवीन धोरणात समावेश करण्यात आला आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गांवरील शिक्षकांना एप्रिलपासून प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांनाही प्रशिक्षित करून त्यांना बालशिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे. जेणेकरून आगामी शैक्षणिक वर्षातील बदलानुसार त्या सर्वांना अध्यापन करता येईल.असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे यांनी सांगीतले.