पूर्णा : तालुक्यातील बरबडी येथे एका २३ वर्षीय तरुण विवाहीतेने सासरच्या जाचाला कंटाळून विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच अंगणाडी सेविकेने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा बरबडी गाव हादरले आहे. एका ४३ वर्षीय अंगणवाडी सेविकेने दि.१६ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदरील महीलेने आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र समजू शकले नाही.
बरबडी येथील रहिवासी वनिता रामराव शिंदे असे मयत अंगणवाडी सेविकेचे नांव आहे. त्यांचा मुलगा अर्जुन शिंदे यांनी दिलेल्या खबरीनुसार दि.१४ रोजी बरबडी शिवारातील शेतकरी बालाजी शिंदे यांची गट नंबर ११४ मध्ये सामाईक शेती आहे. याशेतात असलेल्या विहिरीत अंगणवाडी सेविका असलेल्या वनिता शिंदे यांनी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास उडी घेतली. सदरील घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी तीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला.
या घटनेची माहीती मिळताच पूर्णा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, फौजदार प्रकाश इंगोले, बिट जमादार आमेर चाऊस, चापोशि शेंबेवाड आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. मयत महीलेचे प्रेत विहीरी बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तपास आमेर चाऊस हे करत आहेत.