नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चीनची वाढती अंतराळ शक्ती आणि अंतराळातील लष्करी आव्हाने पाहता भारत एक मजबूत एरोस्पेस शक्ती निर्माण करण्यासाठी पावले उचलत आहे. भविष्यात हवाई दल ५२ नवीन उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी हवाई दल इस्रो आणि डीआरडीओ सोबत काम करत आहे.
अंतराळात भारताची ताकद वाढवण्याबाबत, हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल अमर प्रीत सिंग म्हणाले की, भारतीय वायुसेना ‘एसपीएस-३’ कार्यक्रमासह त्याच्या अंतराळ-आधारित प्रणालींना बळकट करण्यासाठी काम करत आहे. त्यासाठी नवीन उपग्रहांची आवश्यकता आहे. या कार्यक्रमावर अधिक काम करण्यासाठी हवाई दल इस्रोशीही बोलणी करत आहे. हैदराबादमधील एअर वॉरियर्स केंद्रात याविषयी प्रशिक्षण सुरू आहे.
सध्या हवाई दलाने एक उपग्रह अवकाशात सोडला आहे. त्याची परिचालन क्षमता वाढविण्यासाठी लवकरच आणखी २ उपग्रह अवकाशात सोडणार आहे. दळणवळण, हवामानाचा अंदाज, नेव्हिगेशन, ट्रॅकिंग, रिअल टाइम पाळत ठेवणे, लष्करी ऑपरेशन्स यासारख्या उद्देशांसाठी याचा वापर केला जाईल.
या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी हवाई दल भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या सहकार्याने काम करत आहे. भारताला एक मजबूत एरोस्पेस पॉवर बनवण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.
चौकट
भविष्यात अवकाश ही युद्धभूमी ठरेल…
देशाच्या तिन्ही सैन्यांची संयुक्त अंतराळ कमांड असलेल्या हवाई दलालाही प्रशासकीय स्तरावर अशा संयुक्त अवकाश कमांडची निर्मिती करायची आहे, ज्यामध्ये तिन्ही दलांचा सहभाग असेल. इस्रो आणि डीआरडीओ सारख्या संस्थांचायाशिवाय एरोस्पेसशी संबंधित खासगी कंपन्यांचाही त्यात समावेश करण्यात येणार आहे. भविष्यात अवकाश हे युद्धभूमी असेल. म्हणून, स्वत:चे संरक्षण महत्वाचे आहे. भविष्यातील लढाया जमीन, समुद्र, आकाश तसेच सायबर आणि अवकाशात लढल्या जातील. अशा परिस्थितीत आपल्या महत्त्वाच्या तळांचे रक्षण करण्यासाठी आपल्याला अंतराळातील संरक्षणात्मक आणि आक्षेपार्ह दोन्ही शक्ती वाढवाव्या लागतील. जगातील इतर देशांशी तुलना केली तर अमेरिका, रशिया आणि चीन आपापल्या अंतराळ सैन्याच्या तयारीत खूप पुढे गेले आहेत. अशा परिस्थितीत भारतालाही आपल्या अंतराळ दलाची तयारी अधिक वेगाने पुढे नेण्याची गरज आहे.