टोकियो : वृत्तसंस्था
जपान सौरऊर्जेपासून अंतराळात वीज निर्माण करणार असून, ती तारांशिवाय पृथ्वीवर पाठवणार आहे. जपानने हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यामुळे हे शक्य होईल. या तंत्रज्ञानामध्ये उपग्रह सूर्यप्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर करून मायक्रोवेव्हच्या रूपात पृथ्वीवर पाठवेल आणि विशेष अँटेनाद्वारे वीज उपलब्ध होईल.
जपान अंतराळ प्रणालीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला ‘ओहिसामा’ (सूर्याचे जपानी नाव) असे नाव देण्यात आले आहे. प्रकल्पांतर्गत १८० किलो वजनाचा उपग्रह २२ स्क्वेयर फूट सौर पॅनेलसह उपग्रह लवकरच अवकाशात पाठवला जाईल.
पॅनेल सूर्यप्रकाशाची मदत घेत बॅटरी चार्ज करेल. शास्त्रज्ञांच्या मते, हा उपग्रह सुमारे ४०० किमी उंचीवरून सध्या एक किलोवॅट वीज पाठवणार आहे. सध्या याची केवळ चाचणी घेण्यात येत आहे. अमेरिकेने २०२० मध्ये असाच प्रयोग केला होता; परंतु जास्त खर्चामुळे हा प्रकल्प पुढे नेला नाही.
सामान्य सौर पॅनेलमध्ये सूर्याची ऊर्जा विजेत रूपांतरित होते व तारांद्वारे पाठविली जाते; परंतु अंतराळातून पाठवलेली वीज मायक्रोवेव्ह मध्ये रूपांतरित केली जाईल आणि वायरलेस पद्धतीने आणली जाईल.
या तंत्रज्ञानाचा उद्देश सूर्याच्या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे हा आहे. यामुळे पृथ्वीवर स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेचा पुरवठा वाढवता येणार आहे, असे संशोधकांनी माहिती देताना सांगितले.
वीज नेमकी कशी घेणार, काय आहेत रिसीव्हर्स?
जपान अंतराळ प्रणालीने (जेएसएस) उपग्रहाच्या प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली नसली तरी अहवालानुसार तो एप्रिलनंतर लाँच केला जाऊ शकतो, असे संशोधकांनी सांगितले. अंतराळातून वीज मिळविण्यासाठी ६०० स्क्वेयर मीटर क्षेत्रात १३ रिसीव्हर्स तयार करण्यात आले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास वीज साठवणुकीची क्षमता वाढणार आहे.