26 C
Latur
Sunday, March 9, 2025
Homeमहाराष्ट्रअंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा

अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा

कुंभमेळ्यातील पवित्र स्रानाची राज ठाकरें कडून खिल्ली

पुणे : प्रतिनिधी
देशातली एकही नदी स्वच्छ नाही. कोरोना आजारातून देश नुकताच बाहेर निघाला आहे. मात्र कुणालाही त्याचं देणंघेणं नाही आणि लोक कुंभमेळ्यात गर्दी करत अंघोळी करत आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा. अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा. असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्रानावर भाष्य करत खिल्ली उडवलीय. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त ते पिंपरी चिंचवड मध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

दरम्यान, मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड येथे मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी कुंभ मेळ्याबाबत टीका करत म्हणाले, मध्यंतरी मुंबईत आमच्या पदाधिका-यांची मेळावा बैठक लावली होती. त्यात काही शाखेचे पदाधिकारी गैरहजर होते आणि जे गैरहजर होते त्यांची हजेरी मी घेतली. त्यावेळी प्रत्येकाला विचारलं असता त्यातला अनेकांनी आपली आपली करणे दिली.

त्यातल्या बहुतांश लोकांनी कुंभमेळ्याचे कारण पुढे केले. मुळात तुम्ही पाप करताच कशाला? असा प्रश्न मी त्यांना केला. बाळा नांदगावकर ही कमंडलुमधून पाणी घेऊन आले. मी नाही पिणार पाणी वैगरे, असं मी त्यांना म्हणालो. सोशल मीडियावर माणसे-बाया अंग घासून अंघोळ करताय आणि आमचे बाळा नांदगावकर पाणी प्यायला देत आहेत. मला सांगा कोण पिणार ते पाणी, असं म्हणत राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पवित्र स्रानाची खिल्ली उडवली आहे.

नुकताच करोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहेत. कुणालाही कुणाचे देणेघेणे नाही. परदेशात ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस तिथल्या नद्या पाहतो तर त्या एकदम स्वच्छ असतात. आपण आपल्या इथे नद्यांना माता म्हणतो मात्र परदेशात असे होत नाही. आता तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा. असेही राज ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR