मुंबई : अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजपचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या कार्यालयावर अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी रात्री तलवारी घेऊन हल्ला केला. यात कार्यालयाचे मोठे नुकसान झाले. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
भाजपचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांचे अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोडवर स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्सशेजारी कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता हा प्रकार घडला.
तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी घेतलेले काहीजण अचानक कार्यालयाजवळ आले. त्यांनी कार्यालयाच्या काचा तलवारीने फोडून धुडगूस घातला. यानंतर कार्यालयात काम करणा-या एका तरुणावर देखील १५ ते १६ वेळा तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, तरुणाने मध्ये खुर्ची धरल्याने तो वाचला. तसेच, सगळ्या खुर्च्यांवरही तलवारीने हल्ला करत नासधूस केली.
हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. अवघ्या २३ सेकंदात अज्ञात हल्लेखोर कार्यालयाची तोडफोड करत पसार झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
याबद्दल रोहित महाडिक म्हणाले, १० ते १२ जण हल्लेखोर तलवारी, चॉपर घेऊन आले. ऑफिसच्या काचा पहिल्यांदा फोडल्या. मग, कार्यालयातील कर्मचारी बाहेर बसलेला, तो धावून कार्यालयात आला. कार्यालयात आल्यावर एका ठिकाणी उभा राहिला तर त्याच्यावर १६ वेळा तलवारीने हल्ला करण्यात आला.