लातूर : प्रतिनिधी
अकरावी प्रवेशप्रक्रिया यंदापासून केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून राबविण्यात येणार असून याचे संकेतस्थळ दि. ९ मे पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. पण प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असल्याने प्रवेशोच्छूक विद्यार्थ्यांना आता १९ मे पासून नोंदणी करता येईल, असे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल दि. १३ मे रोजी जाहीर करण्यात आला. त्याअधीपासूनच अकरावीचा प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा शिक्षण विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार होती परंतू, आता प्रवेशोच्छूक विद्यार्थ्यांनी आता १९ मे पासून नोंदणी करावी, असे जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिक्षण विभागाने संकेतस्थळ विकसीत केले आहे. शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालय यांना या संकेतस्थळावर दि. १५ मेपर्यंत नोंदणी करता येईल. यावेळी शाखांची माहिती, प्रवेश क्षमता आदी माहिती भरण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी हे संकेतस्थळ सुरु होणार आहे. या माध्यमातूनच यंदा लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे अकरावीसाठीचे प्रवेश निश्चित होणार आहेत. ऑफीलाईन प्रवेश होणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.