लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या ४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अकृषी कर रद्द करण्याबाबतचा निर्णय झाला होता. मात्र त्याचा शासन आदेश निघालेला नाही तो आदेश त्वरित काढावा, अशी मागणी दि. २४ मार्च रोजी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सदरील आदेश तातडीने काढण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.
लातूर शहर महापालिकेने अकृषी कर भरला नाही म्हणून महसूल विभागाने लातूर येथील यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल सील केल्याची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. गाव तसेच महापालिका हद्दीतील अकृषी कर रद्द करण्याचा निर्णय शासनाने ४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पूर्वीच घेतलेला आहे मात्र शासन आदेश अद्याप निघालेला नाही ही बाब आमदार अमित देशमुख यांनी या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. लातूर महापालिका व इतर शासकीय, निमशासकीय आस्थापनांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने या संदर्भातील शासन आदेश लवकरात लवकर काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांना दिले आहे.