अकोला : प्रतिनिधी
अकोला येथील अकोटमध्ये झालेल्या ‘भाजप-एमआयएम’ युतीवरून देशभरात मोठा गदारोळ उडाला होता. या युतीसाठी जबाबदार धरत स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे यांना भाजपने कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. या सर्व घडामोडीनंतर एमआयएम भाजपच्या नेतृत्वाखालील ‘अकोट विकास मंचा’तून बाहेर पडला होता. त्यानंतर एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी स्वत:चा गट स्थापन केला होता.
पहिल्या युतीने वाद झाल्यानंतर आज परत ही युती नव्याने वेगळ्या रूपात परत आली. स्विकृत सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेत परत ‘भाजप-एमआयएम’ युती वेगळ्या रूपात समोर आली. एमआयएमकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी एमआयएमकडून ताज राणा यांचे नाव आले होते. यासोबतच एमआयएमने भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचा मुलगा जितेन बरेठिया यांनाही उमेदवारी दिली. यात ताज राणा यांनी वेळ निघून गेल्यावर उमेदवारी दाखल केल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आला नाही. त्यामूळे एमआयएमकडून एकमेव अर्ज आलेले भाजपचे जितेन बरेठिया हे एमआयएमचे स्विकृत नगरसेवक असतील. एमआयएमचे स्विकृत नगरसेवक पदाचे उमेदवार ताज राणा कोर्टात जाण्याच्या तयारीत.
मात्र, भाजपने एमआयएमसोबत युती करण्यास कारणीभूत असलेले आमदार प्रकाश भारसाकळे आणि शहराध्यक्ष हरीश टावरी यांच्यावर अद्यापही कारवाई केली नाहीये. स्विकृत सदस्यामूळे अकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीची परत नव्याने चर्चा सुरू झाली आहे

