33.4 C
Latur
Saturday, March 14, 2026
Homeमहाराष्ट्रअकोल्यात जेजे मॉलला भीषण आग; दुर्घटनेत लाखोंचे नुकसान

अकोल्यात जेजे मॉलला भीषण आग; दुर्घटनेत लाखोंचे नुकसान

अकोला : प्रतिनिधी
अकोल्यातून मोठी बातमी समोर आली आहे. अकोला शहरातील कपडा बाजारातील ‘जेजे मॉल’मध्ये अग्नितांडव पाहायला मिळाले. आगीचे रौद्ररूप पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळातच संपूर्ण परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळाले. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (६ नोव्हेंबर) पहाटे तीनच्या सुमारास अकोला कपडा मार्केट परिसरातील ‘जेजे मॉल’ला भीषण आग लागली. आधी धूर, मग काही क्षणांतच आगीचे रौद्ररूप या ठिकाणी दिसून आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु शॉर्टसर्किटमुळे या मॉलला आग लागली असल्याचा अंदाज यावेळी घटनास्थळी व्यक्त करण्यात येत होता.

या आगीची माहिती मिळताच अकोला अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर पाण्याचा मारा सुरू केला, तब्बल दोन ते अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत जेजे मॉलला आगीने घेरले होते. या दुर्घटनेत ५० ते ६० लाखांचे मोठे नुकसान झाल्याचे अनुमान लावले जात आहे. कारण, मॉलमधील पूर्ण फर्निचर, याशिवाय कपडे व इतर साहित्य आगीत जळून खाक झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR