मुंबई : प्रतिनिधी
‘खिलाडी’ अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘केसरी चॅप्टर २’ ची घोषणा झाली आहे. २०१९ साली आलेल्या ‘केसरी’ सिनेमाने सर्वांना भावूक केले होते. आता याचाच सीक्वेल येत आहे ज्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने सिनेमाची निर्मिती केली आहे. दोन दिवसांपूर्वीच करणने अत्यंत महत्त्वाचा सिनेमा म्हणत हिंट दिली होती. आता नुकतीच सिनेमाच्या टायटलसह रिलीज डेट आणि टीझरच्या रिलीजचीही अधिकृत घोषणा झाली आहे.
अक्षय कुमारने सोशल मीडियावर व्हीडीओ शेअर केला आहे. भिंतीवर बंदुकीच्या गोळ्या मारल्याचे निशाण आहेत. बॅकग्राऊंड म्युझिकसह ‘क्रांतीचा साहसी रंग’ असं पुढे लिहून येतं. यानंतर ‘केसरी चॅप्टर २’ हे टायटल दिसतं. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘काही लढाया या हत्यारांशिवायही लढल्या जातात.’ ‘केसरी चॅप्टर २’ चा टीझर २४ मार्चला येत आहे. १८ एप्रिल रोजी सिनेमा जगभरात प्रदर्शित होत आहे.
‘केसरी’ सिनेमात २१ शीख सैनिकांच्या धैर्याची आणि बलिदानाची कहाणी दाखवण्यात आली होती. कालच सिनेमाला ६ वर्षे पूर्ण झाली. सिनेमाने २०० कोटी पार कमाई केली होती. सिनेमातील अक्षय कुमारच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. त्याच्यासोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत होती. तर आता ‘केसरी चॅप्टर २’ मध्ये जालियनवाला बागची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. यामध्ये अक्षयसोबत आर. माधवन आणि अनन्या पांडेही मुख्य भूमिकेत आहेत. यानिमित्ताने तिघेही पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. अक्षय कुमारचा यावर्षीच ‘स्काय फोर्स’ आला होता, जो ब-यापैकी चालला. याशिवाय त्याच्या ‘जॉली एलएलबी ३’ चीही घोषणा झाली आहे.