मुंबई : वृत्तसंस्था
९० च्या दशकात अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचे एकत्रित सिनेमे खूप गाजले होते. ‘मै खिलाडी तू अनाडी’,‘तू चोर मै सिपाही’, ‘दिल्लगी’, ‘आरजू’ अशा काही सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. तर अनेक वर्षांनी २००८ साली त्यांचा ‘टशन’ सिनेमा आला. आता तब्बल १६ वर्षांनी दोघं पुन्हा एकत्र येत आहेत. प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘हैवान’ सिनेमात सैफ-अक्षय मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच सिनेमाचं शूट सुरु झालं असून अक्षय कुमारने सेटवरील व्हिडिओ शेअर केला आहे.
अक्षय कुमार आणि सैफ अली खानची आगामी ‘हैवान’ सिनेमात वर्णी लागली आहे. सिनेमाचं शूटही सुरु झालं असून अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या हातात सिनेमाच्या नावाचा क्लॅपबोर्ड आहे. तर तो सैफ आणि प्रियदर्शनसोबत गप्पा मारताना आणि मस्ती करताना दिसतोय. कॅप्शनमध्ये अक्षय लिहितो, ‘हम सब ही है थोडे से शैतान. कोई उपर संत, कोई अंदर से हैवान’. माझा आवडता दिग्दर्शक प्रियदर्शनसोबत आज हैवानचं शूट सुरु करत आहे. १८ वर्षांनंतर सैफसोबत काम करायला मिळतंय याचाही आनंद आहे. हैवानियत सुरु करुया.
इतक्या वर्षांनंतर सैफ आणि अक्षयला एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. व्हिडिओमध्ये सैफ-अक्षयही खूप उत्साही दिसत आहेत. तर अक्षय कुमारचा ‘जॉल एलएलबी ३’सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे.