मुंबई : ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा तिसरा भाग यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दोन भाग आतापर्यंत प्रदर्शित झाले असून, दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या चित्रपटाच्या तिस-या भागात पुन्हा एकदा अजय देवगण, श्रेया सरन आणि तब्बू यांची जोडी पाहायला मिळणार आहे.
सुरुवातीला अक्षय खन्ना देखील या चित्रपटाचा भाग असल्याचे म्हटले गेले, परंतु आता या चित्रपटातून तो बाहेर पडला आहे. अक्षय खन्नाने ‘दृश्यम ३’ चित्रपट सोडल्यानंतर आता त्यामध्ये एका सुपरस्टारची वर्णी लागली आहे.
या चित्रपटात दक्षिणेतील एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून प्रकाश राज आहेत. स्वत: प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली की त्यांनी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. तसेच त्यांनी पोस्टमध्ये आपण अक्षय खन्नाला रिप्लेस केले नाही, असेही स्पष्ट केले
प्रकाश राज यांचे ट्वीट
प्रकाश राज यांनी आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवर पोस्ट करत लिहिले, ‘‘या रंजक फ्रँचायझी ‘दृश्यम ३’च्या हिंदी आवृत्तीचे शूटिंग सुरू केले आहे. एक उत्तम टीम आणि शानदार भूमिकेसह. मला खात्री आहे की तुम्हाला हे आवडेल. आता ते चित्रपटात कोणती भूमिका साकारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यापूर्वीही अजय देवगण आणि प्रकाश राज यांनी ‘सिंघम’ फ्रँचायझीत एकत्र काम केले आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती.
दरम्यान, ‘दृश्यम ३’ च्या दिग्दर्शनाची धुरा अभिषेक पाठक यांच्या खांद्यावर आहे. हा बहुचर्चित चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ ला रिलीज होणार आहे.

