मुंबई : प्रतिनिधी
बदलापूर येथील दोन शाळकरी बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला. मात्र, या चकमकीला पोलिसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिला. आता त्याही पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, असा दावा करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईत संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ते बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, पोलिसांना बदनाम केले जात आहे. अक्षय शिंदेला ज्या अंतरावरून गोळी मारली ते अंतर हास्यास्पद आहे. त्याच्या हातात बेड्या होत्या. मग तो कोणती रिव्हॉल्व्हर काढणार, कोणाच्या खिशातून काढणार? आता तर हेही सिद्ध झाले की त्या रिव्हॉल्व्हरवर अक्षय शिंदेचे ठसेच नाहीत. हे प्रकरण बलात्काराचे असल्याने लोक बोलायला घाबरतात. पण अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही.
ते पुढे म्हणाले, बलात्कार केलेल्यांना सोडवण्याकरता अक्षय शिंदेची हत्या झाली. बलात्कार केलेले कोण होते? जे मी जात वर्चस्ववादाची लढाई म्हणतो, अक्षय शिंदेची हत्या झाल्यानंतर ते लगेच हजर झाले. यातील सर्वांत मोठी गोष्ट असते माणसाची मेमरी शॉर्ट आहे. या एकाच गेमवर सरकार खेळत असते.
या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल नाही
अक्षय शिंदेला जिथे मारले तो मतदारसंघ माझा आहे. त्याला जिथे मारले तिथे बाजूला एक चहावाला उभा होता. त्या चहावाल्याने मला फोन करून सगळे व्यवस्थित सांगितले. इथे काहीतरी झाले आहे. फायरिंग झाल्याचा आवाज आल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर अक्षय शिंदेचे दुपारपर्यंत प्रकरण समोर आले.