काही शब्दांना मोठे महत्त्व असते, त्याला एक प्रकारचे वजन असते. ‘अखेर’ या शब्दाचेही तसेच आहे, पण असा प्रश्न पडतो की हा सन्माननीय अखेर शब्द ‘आधीच’ का येत नाही. सारे काही होऊन गेल्यावर, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर गदारोळ माजल्यानंतर सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून हे ‘अखेर’ महाराज येतात. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कंपनी खंडणी प्रकरणावरून राजीनाम्याची मागणी होत असलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आपल्या दोन सहाय्यकांमार्फत त्यांनी तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा शिफारशीसह राज्यपालांकडे पाठवल्यानंतर त्यांनी तो स्वीकारल्याचे संध्याकाळी जाहीर करण्यात आले. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या तीन महिन्यांपासून करण्यात येत होती. तेव्हा अजित पवारांनी मुंडे यांना पाठीशी घातले होते. चौकशीत त्यांचे नाव कुठे, असा सवाल करीत त्यांना अभय दिले होते. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अजित पवारांनी फेटाळली होती. तसेच मुंडे यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सामील करून घेत त्यांचे महत्त्व अधोरेखित केले होते. राजीनामा देण्यासाठी मुंडे दोषी कुठे आहेत, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात होता.
पण ‘अखेर’ मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण तो देताना म्हटले की, माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तवसुद्धा मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरल्याने धनंजय मुंडेंवर राजीनामा देण्याची पाळी आली असली तरी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मात्र सध्या सुपात आहेत. नैतिकतेच्या मुद्यावरून राजीनामा देणारे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री सोडले तर आजच्या जमान्यात राजीनामा देणारे कोणी सापडणारच नाहीत. नैतिकतेच्या मुद्यावरून राजीनामा हा आज अत्यंत दुर्मिळ प्रकार बनला आहे. विरोधकांकडून मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असली तरी याच विरोधकांनी सत्तेत असताना नवाब मलिकांना ईडीने अटक केल्यानंतरही त्यांचा राजीनामा घेतलेला नव्हता. सध्या सत्तेत असलेल्या पण तेव्हा विरोधक असलेल्यांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आकाश-पाताळ एक केले होते. म्हणजेच नैतिकतेच्या मुद्यावरून राजीनामा देणे हा प्रकारच दुर्मिळ होत चाललाय! अलिकडे काही राजकीय नेते साळसूदपणाचा आव आणून आपल्या बुद्धीचे प्रदर्शन करताना दिसतात.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा दिला होता असे हास्यास्पद विधान करतात. मग नैतिकता कृषिमंत्री कोकाटेंना लागू नाही का? ज्यांनी राजीनामा दिला ते तब्येतीचे कारण सांगतात मग विश्वास कोणावर ठेवायचा? नैतिकता जोपासायची असेल तर धनंजय मुंडे यांनी राजकीय संन्यास घेऊन राजकारणात चांगला पायंडा पाडावा मग अजित पवार आणि सुनील तटकरे नैतिकतेच्या मुद्यावर साळसूदपणे बोलू शकतील आणि त्यांच्या कोडगेपणाला जनता माफ करेल! धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचे सीआयडीने सादर केलेल्या दोषारोप पत्रात स्पष्ट झाले आहे. देशमुख कुटुंबाच्या संघर्षानंतर आणि समाजमाध्यमाच्या रेट्यामुळे अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. हत्या प्रकरणाला ८० दिवस झाल्यानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला. हा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिला असे कसे म्हणता येईल? संतोष देशमुखांना निर्र्घृणपणे जी मारहाण झाली ते फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झाले असे मुंडे म्हणतात.
इतके दिवस त्यांच्या डोळ्यावर झापडे होती का? देशमुख कुटुंबाच्या आर्त किंकाळ्या त्यांना ऐकू येत नव्हत्या का? हा अस्सल कोडगेपणाच म्हणावा लागेल. पूर्वीच्या जमान्यात आपल्या खात्यात काही अघटित घडले की, त्याची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा दिला जात असे. आज मंत्रिमहोदयांकडे राजीनामा मागावा लागतो, आकांडतांडव करावा लागतो. तरीसुद्धा गेंड्याच्या कातडीचे मंत्री हूं की चूं करत नाहीत! मग पूर्वीचे मंत्री बरोबर होते की आताचे? यामागची गोम अशी की, मिळालेली सत्ता सहजासहजी सोडावी वाटत नाही अथवा सोडता येत नाही. कारण गेलेली किंवा सोडलेली सत्ता परत कधी मिळेल ते सांगता येत नाही. तेव्हा मिळालेल्या सत्तेला घोरपडीसारखे चिकटून राहा हा मंत्र आजचे मंत्री जपताना दिसतात. नि:स्पृह मंत्र्यांचा जमाना इतिहासजमा झाला आहे, लोकप्रतिनिधीच्या गोंडस नावाखाली स्वत:चे खिसे भरणे सुरू आहे.
अनेक राजकारणी मंडळींना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी पोलिस आहेत. काही नेत्यांना तर तडीपारचा शिक्का बसलेला आहे तरीही ते राजकारणी आहेत. किरकोळ कारणासाठी गुन्हा नोंद झालेले राजकारणी आपण समजू शकतो. पण जेव्हा कायद्याचे रक्षण करणारे पोलिस अधिकारी अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकारण्यांच्या संरक्षणासाठी काम करत असतात अर्थात नोकरी म्हणून त्यांना तसे करावे लागते, तेव्हा प्रश्न पडतो की, कायद्याचे रक्षण करणारे पोलिस अधिकारी अथवा पोलिस मोठे की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे राजकारणी मोठे? कोडगेपणाचा कहर करणारे धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे आपल्या पहिली पत्नी नसल्याचा दावा केला आहे कारण त्यांच्याशी कधीही लग्न झालेले नाही. त्यांना पोटगी मंजूर झाली असली तरी न्यायाधीशांनी विचार न करता अंतरिम पोटगी मंजूर केली असेही त्यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे म्हणाल्या, राजीनामा देण्यास उशीर झाला, तो आधीच द्यायला हवा होता. म्हणजे अखेर पंकजा मुंडेही बोलल्या!