पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना आमदार महेश लांडगेंवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना महेश लांडगे यांनी एकेरी भाषेत अजित पवार यांचा उल्लेख केला होता.
यानंतर आता राजकारण तापले असून, या टीकेला राष्ट्रवादीच्या फायर ब्रँड नेत्या तसेच पुणे महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार रुपाली पाटील-ठोंबरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
एकेरी उल्लेख करणे आमदार महेश लांडगे यांना शोभत नाही. ज्यावेळी हे नगरसेवक होते तेव्हा राजकारणाची अ, आ, ई बाराखडी ते अजितदादांच्या बोटाला धरून शिकलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या भाषेत अजितदादांवर बोलला आहात हे अत्यंत चुकीचे असल्याचे रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या आहेत. तसेच महेश लांडगेंचे पिंपरी-चिंचवडकरांच्या लोकांसाठी योगदान काय? असा सवाल त्यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना आम्ही काय बांगड्या भरल्यात का असे महेश लांडगे म्हणाले होते. यावर रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, बांगड्या घालणे हा स्वाभिमान आहे. बांगड्याचे महत्त्व काय हे आम्हाला विचारा, असा सवाल त्यांनी केला आहे. ते काय स्वत:ला उस्ताद समजतात. कुठला माज आहे तुम्हाला? हेच का घरातले संस्कार? असेही रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या आहेत.
पक्ष बदलल्यानंतर भाजपमधील लांडगेंसारखी काही लोकं विनाकारण अपशब्द बोलणे, विनाकारण एकेरी भाषेत बोलत असल्याचा आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. ते स्वत: हिंदुत्ववादी सांगतात.. कसले खोटारडे आहेत. निवडणूक आहे टीकाही त्याच पद्धतीने केली पाहिजे. तुम्ही कामावर बोलले पाहिजे, अशा शब्दांत रुपाली ठोंबरे यांनी महेश लांडगे यांना सुनावले आहे.

