पिंपरी : अजित दादा भाजपसोबत गेल्याने त्यांची व्होट बँक कमी झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना पाडणार म्हटले, पण तेच लोकसभेला चार जागा लढणार, अशी चर्चा आहे. त्यांच्यात प्रफुल पटेल हेच हुशार आहेत, असे वाटते.
त्यांनी चार वर्षे बाकी असतानादेखील राज्यसभेवर पाठवण्यात आले. बाकी नऊ जणांना काहीच मिळाले नाही, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार हे बुधवारी पिंपरी-चिंचवड दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले, निवडणुकीपूर्वी अजून दहा ते पंधरा मोठे नेते त्यांच्यावर असलेल्या दबावामुळे भाजपमध्ये सामील होतील.
सध्या गृहखाते फेल झाले आहे. लोकांची घरे फोडण्यात आणि राजकारण करण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अडकले आहेत. त्यामुळे त्यांना खात्यांवर लक्ष देण्यात वेळ नाही.