पुणे : अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको… पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांना आमच्या बोकांडी बसवले आहे, असे म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी खदखद व्यक्त केली आहे.
भाजप आमदार राहुल कुल यांच्यासमोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये खदखद बोलून दाखवली आहे. हा व्हीडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी म्हणाले, अजित पवारांना या महायुतीतून बाहेर काढा, असे प्रत्येक कार्यकर्त्याचे मत आहे. याला तुम्ही सल्ला समजलात तरी चालेल. अजित पवारांनी सुभाष बापू, राहुल दादांवर, योगेश अण्णांवर अन्याय केला आहे. हे तिघेही मंत्री झाले असते. अनेक लोकांना महामंडळ मिळाले असते. अजितदादांकडे आमचे आबासाहेब सोनावणे आणि श्याम गावडे निधी मागायला गेले तर अजितदादा म्हणाले, तुमचा काय संबंध.. आम्ही १० टक्केच निधी देणार… अरे नको आम्हाला अशी सत्ता.
अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची अशीच परिस्थिती आहे. सोलापूरला कायम बाहेरच्या जिल्ह्याचा पालकमंत्री मिळाला आहे. स्वाभिमानी नेतृत्व पुणे जिल्ह्याला मिळत नाही. पुणे जिल्ह्यातील लोकांचे हाल झाले आहेत. ज्या राष्ट्रवादीचा गेली १० वर्षे आम्ही विरोध करतोय तीच राष्ट्रवादी तुम्ही आमच्या बोकांडी आणून ठेवली आहे. अक्षरश: कार्यकर्ते भीतीच्या वातावरणात आहेत. अजित पवारांना कशासाठी सत्तेत घेतले आहे? असा सवाल देखील भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्षांनी केला आहे.